सुमारे 4 हजार टंकलेखन संस्थाचालक वाऱ्यावर, कोरोनामुळे मार्चपासून संस्थांना टाळे

मागील 100 वर्षांपासून राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांतील लघुलेखक, टंकलेखक, संगणक टंकलेखक घडविणाऱया सुमारे 4 हजार विनाअनुदानित टंकलेखन संस्थाचालक तसेच येथे काम करणाऱया शिक्षकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. 16 मार्चपासून या संस्था राज्य परीक्षा परिषदेच्या सूचनेनुसार बंद आहेत. राज्यासह देशभरात ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली असली तरी टंकलेखन संस्थांना अद्याप टाळे लागले आहे.

राज्यात टप्प्याटप्याने इतर संस्था, व्यवसाय सुरू झाल्याने टंकलेखन संस्थाचालकांनीही संस्था सुरू करण्याची मागणी केली माञ टंकलेखन संस्था शैक्षणिक क्षेत्रात येत असल्याने शाळा-काँलेज सुरू झाल्यावरच परवानगी देण्यात येईल, असे अधिकार्यांनी सांगितल्याचे सोलापूर येथील सुयश टंकलेखन संस्थेच्या संचालिका जयश्री लगड यांनी स्पष्ट केले. शाळा काँलेजना सरकारचे अनुदान मिळते त्यामुळे तेथील संस्थाचालक व शिक्षकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवत नाही. माञ टंकलेखन संस्थाचालक व शिक्षकांची परिस्थिती बिकट असल्याचेही लगड यांनी सांगितले. लाईट बिल, जागेचे भाडे भरण्यासही संस्थाचालकांकडे सध्या पैसे नाहीत.

टंकलेखन संस्थांमध्ये दोन विद्यार्थ्यांमधील अंतर सुमारे 3 मीटर असते. त्यामुळे या संस्था सुरू करण्यास काहीच हरकत नाही. तसेच संस्थाचालकांना मानधन मिळण्याची मागणीही संस्थाचालकांकडून होत आहे.

मार्च महिन्यापासून बंद असलेल्या परीक्षा परिषदेशी संलग्नित टंकलेखन संस्था सुरू करण्याविषयीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळेल अशी आशा आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक अटी पाळूनच टंकलेखन संस्था पुन्हा सुरू करण्याविषयीचा निर्णय घेतला जाईल.
-z टी. एन. सुपे, संचालक, राज्य परीक्षा परिषद, पुणे.

आपली प्रतिक्रिया द्या