
स्वरचंद्रिका आशा भोसले यांना सोमवारी साश्रुपूर्ण नयनांनी निरोप देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मशानभूमीत आशा भोसले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. दशकानुदशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चिरतरुण, चैतन्यमयी सूर अनंतात विलीन झाला. आपले अवघे जगणे बहरून टाकणाऱ्या आशाताई आज रडवून गेल्या. ताई, अभी ना जाओ छोड के… अशाच भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आल्या.
आशा भोसले यांनी रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. संगीतविश्वातील एक अढळ तारा निखळला. आशाताईंची अचानक झालेली ‘एक्झिट’ मनाला चटका लावून गेली. आज त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. दादरच्या भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव लोअर परळ येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तिथे पोलीस बँड पथकांनी सलामी दिल्यानंतर पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये ठेवण्यात आले. पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. अंत्ययात्रेला गायन, संगीत, सिने, नाटय़, राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
आशाताईंच्या नावाने मुंबईत संगीत अकादमी उभारणार
आशा भोसले यांच्या नावाने मुंबईत संगीत अकादमी सुरू करण्याची घोषणा आज राज्य शासनाने केली. वांद्रे-अंधेरी परिसरात संगीत अकादमीसाठी जागा उपलब्ध व्हावी, अशी मागणी आशा भोसले यांनी यापूर्वी केली होती. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या या प्रस्तावालाच पुढे नेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. याबाबत म्हाडाला आदेश देण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगेशकर कुटुंबियांचे सांत्वन केले.
सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर

व्यावसायिक आयुष्याच्या पलीकडे जाऊन आशाताईंनी अनेकांशी व्यक्तिगत नाती जपली होती. ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर यांच्याशीही आशाताईंचे असेच कौटुंबिक नाते होते. या दोघांच्या सार्वजनिक आणि काwटुंबिक भेटींमध्ये नात्यातील हा जिव्हाळा नेहमी जाणवत असे. आज लाडक्या आशाताईंचे अंत्यदर्शन घेताना सचिनला अश्रू अनावर झाले. त्याची पत्नी अंजली हीदेखील भावूक झाली होती. सचिनचा मुलगा अर्जुनच्या अलीकडेच झालेल्या विवाहाला आशाताई आवर्जून उपस्थित होत्या. सार्वजनिक कार्यक्रमातली त्यांची ही शेवटची उपस्थिती होती. त्यांच्या आठवणींनी भावूक झालेल्या सचिनने ‘एक्स’वर त्यांच्या शेवटच्या भेटीचा फोटो शेअर केला. ही आठवण चिरंतन राहील, अशी भावना त्याने व्यक्त केली.



























































