माझ्या पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलंत, तरीही तुम्ही पळालात! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्याला अडवण्याचे बरेच प्रयत्न झाले आणि होत आहेत. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तरी मशाल घेऊन तुम्ही पुढे जात आहात. प्रत्येक चिन्हाचं, शस्त्राचं एक महत्त्व असतं. धनुष्यबाण रामाचं होतं, त्याने रावणाला मारण्यात आलं. मशाल अन्यायाला जाळते. अंधारात वाट दाखवते. ती मशाल आता आपल्याकडे आहे. ती पुढे घेऊन जात काम करूया.

‘माझ्या पक्षाचं नाव गोठवलंत आणि चिन्ह गोठवलंत, तरीही तुम्ही पळालात’ अशा शब्दांत ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दार शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. केवळ मनःस्ताप द्यायचा, त्रास द्यायचा, छळायचे आणि शिवसेना संपवायची याच हेतूने हे सर्व करण्यात आलं, असा घणाघातही त्यांनी केला.

बुलढाणा येथून आलेल्या शिवसैनिकांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसैनिकांनी आपल्यासोबत आणलेली मशाल उंचावत आम्ही कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांना दिला. त्यांच्याशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेशी गद्दारी केलेल्या शिंदे गट आणि भाजप यांचा समाचार घेतला. भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

‘निवडणूक आयोगाने आपलं नाव आणि चिन्ह काही ठरावीक काळासाठीच गोठवलं आहे. आपलं वर्चस्व सिद्ध केल्यानंतर ते आपल्याला पुन्हा मिळणार आहे.’ असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. त्यावर शिवसैनिकांनी ‘झुकेंगे नही, लडेंगे’, ‘उद्धव ठाकरे यांचा विजय असो’, ‘शिवसेना झिंदाबाद’, अशा घोषणांनी ‘मातोश्री’चा संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

गद्दारांच्या छाताडावर नाचून भगवा फडकवू

‘गद्दारांनी अनेक आमिषं दाखवली, पण आमदार राजन साळवी कोणत्याही आमिषाला बळी न पडता खंबीरपणे आपल्यासोबत आहेत.’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी साळवी यांचे कौतुक केले. गद्दारांनी आपल्याशी गद्दारी केली, पण त्यांच्या छाताडावर नाचून आपण भगवा फडकवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

लवकरच महाराष्ट्र दौरा

लवकरच आपण महाराष्ट्र दौरा करणार असून बुलढाण्यात येऊन सभा घेणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या दौऱ्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू असे ते शिवसैनिकांना म्हणाले.