ही श्रेयाची लढाई नाही! महाराष्ट्राच्या प्रयत्नांना यश मिळाले यासारखे समाधान नाही – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचे समाधान आहे. ही श्रेय घेण्याची लढाई अजिबात नाही. कारण सर्वसामान्य जनतेच्या, विशेषतः दुर्बल समाजाच्या भल्यासाठी काम करणे हे कुठल्याही सरकारचे कर्तव्यच असते आणि म्हणूनच ओबीसी आरक्षणासाठी अगदी पहिल्यापासून महाविकास आघाडीतले आम्ही सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करीत होतो. महाराष्ट्राच्या प्रयत्नांना यश मिळाले यासारखे समाधान नाही, अशी प्रतिक्रिया ओबीसी आरक्षणासंदर्भातील निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेतली. सर्व पक्ष तसेच ओबीसी नेत्यांच्या बैठका घेतल्या, समर्पित आयोग नेमला. आज ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याची परवानगी न्यायालयाने दिल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, हा तिढा अवघड होता. पण तो सोडविण्यासाठी आम्ही त्यावेळेस विरोधी पक्ष, संघटना या सर्वांशी वारंवार चर्चा करून त्यांनाही विश्वासात घेतले होते. जयंत बांठिया यांच्यासारखा अनुभवी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांची टीम यांनी हे शिवधनुष्य पेलले त्याबद्दल त्यांनाही जितके धन्यवाद द्यावेत तितके कमीच आहेत. यामध्ये आयोगाचे सर्व सदस्य तर अतिशय मेहनतीने काम करीत होतेच, शिवाय राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व घटकांनीदेखील सर्वतोपरी प्रयत्न केले. खरं तर सगळय़ांनीच ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे यावर लक्ष पेंद्रित करून एक चांगला लढा दिला. त्यामुळे महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांना यश आले. मी आज मुख्यमंत्री नसलो तरी आमच्या काळात यावर सर्वानुमते जी पावले उचलण्यात आली होती तिला यश मिळाले यासारखे समाधान नाही.