‘हे’ आपल्या देशाच्या लोकशाहीच्या नरडीचा घोट घेतायत, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेतील गोरेगाव व दिंडोशी या मतदारसंघातील शांखांना भेटी दिल्या. यावेळी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी भाजप व मिंधे गटावर निशाणा केला. भाजपची हुकुमशाही ही देशाच्या नरडीचा घोट घ्यायला निघाली आहे, असा जोरदार घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”गद्दारांचं नशीब की शिवसेनाप्रमुख नाहीत नाहीतर यांची कधीच विल्हेवाट लागली असती. मी संयमी आहे पण याचा अर्थ असा नाही की मी लढणारच नाही. ही लढाई केवळ माझ्या एकट्याची नाही, ही लढाई हिंदुत्वाची आहे, मुंबईकरांची आहे, आपल्यासोबत आलेल्या मुस्लींमांची, गुजरात्यांची, उत्तर भारतींयांची आहे. आपल्या सगळ्यांचा देश एक आहे. हे आता भारतमातेला गुलाम करू पाहत आहेत. आपण काय नुसतं बघत बसायचं. 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की संकट आल्यावर त्याचे तुकडे केले नाही तर आपल्यासारखा नामर्द कुणी नाही. हे आपल्या देशाच्या लोकशाहीच्या नरडीचा घोट घेतायत. हे मिंधे त्यांचे पाय चाटतायत. डोळ्यादेखत महाराष्ट्र लुटला जातोय. ओरबडला जातोय. प्रधानमंत्री फक्त गुजरातचे प्रधानमंत्री असल्यासारखे वागत आहेत. महाराष्ट्राला जे ओरबाडले जातेय ते आम्ही सहन करणार नाही. गुजरात समृद्ध झाला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राला तुम्ही ओरबाडून नेले पाहिजे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही असे म्हणणाऱ्या फडणवीसांना मला विचारायचंय की महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का ? कशाला हा भेदभाव करताय. 1992 साली सुद्धा गुजरातींचं, उत्तर भारतीयांचं रक्षण शिवसेनाप्रमुखांनी, शिवसैनिकांनी हिंदू म्हणून केलं होतं. आम्ही कधीच भेदभाव केला नाही. हे पाप आमच्या कडून होणार नाही. कोरोना काळात देखील मी मुख्यमंत्री असताना भेदभाव केला नाही. कोरोना काळात मी अमित शहांना म्हणालो होतो की अन्य राज्यातून आलेल्यांना त्यांच्या घरी जायचंय. तुम्ही स्पेशल ट्रेन द्या. त्यांचा खर्च आम्ही करतो. त्यावेळी ते म्हणाले आता शक्य नाही. अचानक एक दिवशी कामगार लोंढेच्या लोंढे बाहेर पडले. त्या कामगारांना अन्न पाणी आरोग्यांची आपण काळजी घेतली. याल म्हणातात हिंदुत्व. पक्ष फोडणं म्हणजे हिंदुत्व नाही. ती तर नालायकपणा सिद्ध कऱणारी वृत्ती आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

”या लोकसभेसोबत विधानसभेची महापालिकेची निवडणूक घ्या. ही जी मशाल पेटली आहे त्याने एकदाच तुमचा खात्मा करतो. माझ्या मतदारांना देखील सतत त्रास नको. भाजपला देखील राजकीय मरणयातना नको. एकदाच तुमचा फडशा पाडून टाकतो. दोन वर्ष झाले तरी निवडणूका घेत नाहीत. गेले दीड दोन वर्ष प्रशासक नेमून भ्रष्टाचार करतायत. दीड दोन वर्षात एक लाख कोटींची काम दिली गेलीयत. हा तुमच्या आमच्या हक्काचा पैसा आहे. पूर्वी पालिका 640 कोटीने तोट्यात होती. 640 कोटींच्या तोट्यातली महापालिका 90 हजार कोटींच्या प्लसमध्ये आणली. समुद्री महामार्ग जे शिवसेनेचं स्वप्न आहे. या लोकांची डोकीच अर्धवट आहेत त्यामुळे हे अर्धवटच उद्घाटन करणार, कोस्टल रोड हे शिवसेनेचं स्वप्न असल्याने हे घाई घाईत त्याचं उद्घाटन करत आहात. असंच काम करताना समृद्धी महामार्गावर खड्डा पडला आहे. ही आहे मोदी गॅरंटी. तुमच्या आयुष्याच्या वाटेवर खड्डे पडणं ही आहे मोदी गॅरंटी. गोखले पूल जुळतच नाही. हेच प्रशासक इकबाल सिंह चहल कोरोना काळात मी त्यांची पाठ थोपटली होती. आता ते यांच्यासोबत मिळून भ्रष्टाचार करतायत. त्यांच्या विरोधात सामिल व्हायचं की त्यांच्या विरोधात लढा द्यायचा. भाजपला तर कसलीच किंमत नाही. यांना फक्त आरोप करायची सवय लागली आहे. शिवसेनेने कठिण काळात भाजपला खांद्यावर घेतलं. आता तेच भाजपवाले शिवसेनेला संपवायला निघाले आहेत. चिन्ह चोरलं, पक्ष चोरला. पण तुमच्या या चोरबाजाराचा निकाल आम्ही या निवडणूकीत लावणार आहोत”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.