भाजपलाच निर्यात करून टाका, जाऊ द्या सातासमुद्रापार तडीपार; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी रत्नागिरी येथे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी झालेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंधे गटावर जोरदार टीका केली. ”कधी कांद्यांवर निर्यात बंदी, कधी काजू, कधी आंबा; आता तुम्हा या भाजपलाच निर्यात करून सातामुद्रापार तडीपार करून टाका”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला मत म्हणजे विनाशाला मत असा इशारा देखील जनतेला दिला. तसेच इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर कोकणातील बारसू, जैतापूर सारखे विनाशकारी प्रकल्प जमिनीवरूनच नाही तर कागदावरूनही रद्द करून टाकू, असे आश्वासनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

”कोकणात मला प्रचाराची गजर नाही. कोकण हे शिवसेनेचं व ठाकरे कुटुंबाचं हृदय आहे. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला तरी तुम्ही सोबत आहात. शिवसेना फोडली, चोरली, गद्दाराकडे आमच्या पक्षाचं चिन्ह व नाव दिलं. आता भाजपने त्या गद्दाराची तंगडतोड केली. जागा कापल्या. कोकणातली जागा जी इतक्या वर्षापासून शिवसेनेची होती ती आता भाजपकडे गेली आहे. त्या लाचाऱ्यांना कळलंच नाही की गद्दारांचे जे मालक दिल्लीत बसले आहेत. ते शिवसेनेसोबत कोकणाचं नातं तोडायला निघाले आहेत. त्यांना माहित नाही की कोकणात जांभा दगड आहे. कोणे एक काळी हा दगड लाव्हारस होता. त्याचा पुन्हा लाव्हारस होणार नाही असं नाही. आज महाराष्ट्रात भाजपविरोधात लाव्हारस उफाळून वर आलेला आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

”सध्या आयपीएलचे दिवस सुरू आहेत. मॅच बघताना पंचायत होते. की हा खेळाडू या संघात होता. आता तो त्या संघात गेला. असंच देशाच्या राजकाराणात झालं आहे. आयपीएल म्हणजे इंडियन पॉलिटीकल लीग झाली आहे.. मोदींना आता सूर लागत नाहीए. ते कितीही काही बोलले तरी मोदींचा जो आधी आत्मविश्वास होता तो आता दिसत नाही. पहिल्यांदा आपणही फसलो होतो. शिवसेना सोबत होती तेव्हा काय रुबाब होता त्यांचा . त्यांचं एक वाक्य होतं एक अकेला सबपे भारी. आता त्या 56 इंजांच्या छातीतील हवा निघून गेली आहे. काय ही गत झाली आहे. हे सर्व बघून अटलजींचा आत्मा वर रडत असेल. अटलजी म्हणाले होते अशी सत्ता जर मला मिळत असेल तर मी ती चिमटीत देखील पकडणार नाही. आता ते विचार करत असतील ती कुठल्या नाकर्त्याकडे पक्ष गेलाय. शिवसेना तुमच्यासोबत होती. तेव्हा किती वेळा तुम्हाला यावं लागायचं. किती सभा घेतल्या होत्या तुम्ही. विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाश होणार असेल तर विपरीत बुद्धी होणारच. हा देवाचा आशिर्वाद, नियतीचा संकेत आहे. त्यांनीच आम्हाला त्यांच्यापासून दूर केलंय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

संपूर्ण यंत्रणा वापरून शिवसेना, चिन्ह चोरलं. मला इथे बसलेल्या सगळ्यांचा अभिमान आहे. समोर जो उभा आहे. की टोप घालताना खाजवून विचार करावा लागत असेल की आज कोणत्या पक्षात आहोत आपण. आठवतच नाही त्यांना. इतके वर्ष स्वत:सकट स्वत:ची पिलावळी सहीत जिथे सत्ता तिथे तुम्ही झुकता. यांनी एक तरी लघु किंवा सुक्ष्म तुमच्या साईजप्रमाण प्रकल्प कोकणात आणला आहे का. भाजपने यांना त्यांच्या कुवतीप्रमाणेच मंत्रालय दिलं आहे. आता निवडणूकीनंतर हे अतिसूक्ष्म होतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

”आज तुम्ही गद्दारांना आमच्या अंगावर सोडून आमच्याशी लढायला निघालात. हे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. हे माझं वैभव आहे. ही समोर बसलेली जनता माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. आमची घराणेशाही मंजूर आहे. सभेत शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावता ते चालतं. नालायक लोकं तुम्ही माझा धनुष्यबाण चोरता, पक्ष चोरता. आणि माझ्या वडिलांचा फोटो लावता. तुम्हाला गद्दारांची घराणेशाही चालते. कुणाची घराणेशाही तुम्ही पोसताय. कोकण सुसंस्कृत आहे. काल परवाकडे फड़णवीस येऊन गेले की ते म्हणतात आम्हाला मत म्हणजे काँग्रेसला मत. जर कोकणात शिवसेना उभी राहिली नसते. तर आज कोकणता गुंडाराज असता. बारसू मध्ये माता भगिनींना मराहाण केली तेव्हा शिवेसना मध्ये पडली नसती तर हा विषय यांनी संपवला असता. आपलं सरकार आल्यानंतर बारसू जैतापूर मध्यै फौजा उभ्या करू हेच यांच्या डोक्यात आहे. त्यांचा गुंड पद्धतीने यांना कोकण स्वत:च्या विळख्यात घ्यायचा असून तशीच बारसूची रिफायनरिही उभी करतील हे लोक. आमचं सरकार आल्यावर आम्ही कोणताही विनाशकारी प्रकल्प कोकणात येणार नाही. फक्त जमिनीवरच नाही तर कागदावरूही तो प्रकल्प हटवून टाकेन. त्यांना मत म्हणजे विनाशाला मत. एका बाजूला विनायक आहे तर दुसऱ्या बाजूला विनाश आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

”यांचा महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे तो एवढ्या टोकाला पोहोचला आहे की यांना आता जय भवानी जय शिवाजी देखील खटकायला लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. मोदी शहा प्रत्येक सभेत जय श्री राम म्हणतात. आम्हीही म्हणतो जय श्री राम. पण आमच्या महाराष्ट्राच्या नसानसांत जय भवानी जय शिवाजी आहे. ते उपरे दोघे आमच्या रगारगातल त्यांच्या बद्दलचं प्रेम काढू पाहत आहेत. त्यांना उद्धव ठाकरेंनां संपवायचं आहे. मग या मैदानात. उद्धव ठाकरे उतरलाय मैदानात. पण तुमच्या घरगड्यांचा या लढाईत उपयोग करत आहात. ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या राजन साळवीच्या घऱात घुसलात. उद्या आमचं सरकार आल्यावर तुमच्या धरात घुसल्याशिवाय राहणार नाही. मला मोदीजींना सांगायचे आहे की हिंदुहृदयसम्राट तु्मच्या मागे उभे राहिले नसते तर अटलजींनी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकलं असतं, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”यांचा चारशे पारचा नारा होता. मात्र आता काहीच चालत नाही. आपली घटना बदलण्यासाठी यांना चारशे पार . त्यांचे उमेदवार, माजी मंत्री, खासदार बोलत आहेत. घटना बदलण्याची अवदसा का आठवली आहे यांना. म्हणजेच यांना महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे. महाराष्ट्राचे हक्काचे उद्योगधंदे गुजरातला घेऊन जाता. महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहत आहात. जय भवानी जय शिवाजी शब्दावर आक्षेप घेत आहात. मी जाहीरपणे आरोप करतोय कारण महाराष्ट्राच्या सुपुत्र बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहेली घटना तुम्हाला बदलायची आहे. तिथेही ती म हाराष्ट्र पुत्राने लिहली म्हणून बदलायची आहे. इथे सुद्धा तुमचा महाराष्ट्राबद्दलचा आकस दिसतोय. गुजरातमध्ये औरंगझेब जन्माला आलाय त्याला आम्ही काय करू शकतो. आमच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे दैवत जन्माला आले आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

”किती यांचे जुमले. 15 लाख देणार होते. कुणाच्याच खात्यात आले नाही. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात हजारो कोटी आले. दोन ते अडीच वर्षात त्यांनी कमावले. जे काँग्रेसला साठ वर्षात जमलं नाही ते यांनी करून दाखवलं. काँग्रेसला खरंच ते जमलं नाही. मोदीजींनी अडीच वर्षात करून दाखवलं. अर्थमंत्री निर्मला सितारामन होत्या. कोर्टाचा निकाल येईपर्यंत दहा हजार कोटींचे रोखे छापून तयार ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाने यांची वेळेत हंडी फोडली. याच सितारामन बाई बोलल्या आहेत पुन्हा ही स्कीम आणणार. म्हणजे पुन्हा तुमची लूट. त्यांचे पती परकला प्रभाकर यांनी तर गा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचे सांगितचलेआहे. त्यांनी त्याचे नाव मोदी गेट ठेवले आहे. तुमच्याच मंत्रीमंडळातल्या मंत्रीणबाईंचे यजमान बोलतायत. त्यांना का उत्तर देत नाही. आज वाचलं डाळीचे भाव वाढले. मोदीजींना विचारलं तर ते म्हणतील नेहरूजींना वाढवले. नेहरूजींनी 16 वर्षात काय केले ते पुसून टाकून तुम्ही दहा वर्षात काय केलं ते का नाही सांगत. दहा वर्ष तुम्ही काय केलं ते सांगा. आता हे 2047 ला आम्ही काय करू ते सांगतायत. पण 2047 कुणी बघितलं. नोटबंदी तरी कुणाच्या लक्षात आहे का. मला फक्त 100 दिवस त्या असं रडत म्हणाले होते. मात्र आता 2700 हून अधिक दिवस झाले. काय झालं आहे. आता सगळी जनता तुम्हाला अब की बार तडीपार हीच शिक्षा देणार आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.