प्राण गेला तरी बेहत्तर, महाराष्ट्र हुकूमशहाच्या हाती जाऊ देणार नाही! उद्धव ठाकरे यांची सिंहगर्जना

मराठी माणसाच्या बलिदानातून महाराष्ट्राची निर्मिती झाली. 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी आपण त्या हुतात्म्यांना अभिवादन करतो. पण आता केवळ अभिवादन करून चालणार नाही. ते हुतात्मे आपल्याकडे बघताहेत. कारण नरेंद्र मोदी नावाचा हुकूमशहा महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवत फिरतोय. आता शपथ घ्यावी लागेल आणि मी शपथ घेऊन सांगतो… हुतात्म्यांनो, तुम्ही ज्या पद्धतीने मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी गोळ्यांना सामोरे गेलात, तसेच प्राण गेला तरी बेहत्तर, या हुकूमशहाच्या हाती महाराष्ट्र जाऊ देणार नाही, अशी सिंहगर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. भाजपचे दोनाचे तीनशे खासदार झाले, आता तीनशेचे दोन झाल्याशिवाय राहणार नाहीत असे ठणकावून सांगतानाच, इंडिया आघाडीचे 300च्या वर खासदार निवडून येणारच असा जबरदस्त आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आज खडकवासला येथे विशाल सभा झाली. त्या सभेमध्ये मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटाचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच सुप्रिया सुळे यांच्या लढाऊ बाण्याचे कौतुक केले. सुप्रिया सुळे या महिला असूनही वडिलांच्या मागे पहाडासारख्या उभ्या राहिल्या. मला त्यांचा अभिमान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यात रेसकोर्सवर सभा झाली. रेसकोर्सचे ठिकाण योग्यच होते, कारण मोदींना झोपेतही घोडेबाजारच दिसतो, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली. पण रेसकोर्सवरील घोडे वेगळे आहेत आणि मोदींनी विकत घेतलेले घोडे नव्हेत तर खेचरे आहेत, ओझे वाहणारी गाढवे आहेत हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे होते, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.

भाजप आणि मोदींची आपल्याला कीव येते. कारण 2014 मध्ये मोदींबरोबर माझ्याही सभा झाल्या होत्या. पण त्यावेळी त्यांना इतक्या वेळा महाराष्ट्रात यावे लागल्याचे मला आठवत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्या सभांमध्ये मोदी यांनी माझा लहान भाऊ म्हणून उल्लेख केला होता, मग नाते का तोडलेत असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हे शब्द वापरत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी त्याचाही समाचार यावेळी घेतला. शरद पवार त्यांच्या मुलीला आणि मी माझ्या मुलाला आदित्यला मुख्यमंत्री बनवू पाहतोय असे शहा म्हणाले होते. मोदी-शहा फक्त स्वत:साठी लढताहेत, मी, माझा आणि माझ्यासाठी, बस्स. अरे, मुख्यमंत्रीपद इतके सोपे वाटले का. शहांनी एका फोनवर त्यांच्या मुलाला बीसीसीआयचे अध्यक्ष केले तसे मुख्यमंत्रीपद नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

– मोदी माझ्या वडिलोपार्जित शिवसेनेला नकली म्हणाले. कारण त्यांच्याबरोबर आहे ती गद्दारांची फौज, गाढवांची टोळी आहे. तिलाच ते शिवसेना म्हणताहेत.

– मोदींवर आता महाराष्ट्रात ठाण मांडून बसण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र साधाभोळा आहे पण कृतघ्न आणि गद्दार नाही. महाराष्ट्राची परंपरा शूरांना वंदन करणारी आहे. भाजपचे काय चाललेय तर चोरा मी वंदिले. सगळ्या चोरांना वंदन करताहेत.

– आम्ही मोदींसारखे खोटं बोलत नाही, बोलतो ते करून दाखवतो

केंद्रीय कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी काय केले होते अशी विचारणा पंतप्रधान मोदी यांनी कालच्या सभेत केली होती. तो धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी कृषिमंत्री असताना देशातील शेतकऱयांचे कर्ज माफ केले होते आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कुणीही न मागताही महाविकास आघाडी सरकारने शेतकऱयांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले होते. आम्ही मोदींसारखे खोटे बोललो नाही. जे बोललो ते करून दाखवले आणि जे करून दाखवले तेच बोलतो, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला.

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आज खडकवासला येथे विशाल सभा झाली. त्या सभेमध्ये मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे.

मोदी म्हणजे वखवखलेला, बुभुक्षित आत्मा

भटकती आत्मावरून उद्धव ठाकरे यांनी मोदींवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, मोदींच्या त्या सभेला अजित पवार हेसुद्धा उपस्थित होते. त्यांना मी विचारणार आहे की मोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले. कारण भटकती आत्मा असते तसाच वखवखलेला, बुभुक्षित आत्माही असतो जो सगळीकडे फिरत असतो. वखवखलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे फिरताय ना तिथे तुमच्या नादानपणामुळे ज्या शेतकऱयांनी आत्महत्या केल्यात त्यांच्या घराकडे, त्यांच्या घरातल्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघा, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. असाच वखवखलेला आत्मा औरंगजेब साडेतीनशे वर्षांपूर्वी गुजरातच्या दाहोदमध्ये जन्मला होता आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य लुटायला आला होता. तो आग्य्राहून आला होता पण महाराष्ट्रातून परत गेलाच नाही. अजूनही त्याचा आत्मा इकडेच कुठेतरी भटकत असेल. अशी वखवख बरी नाही, असे उद्धव ठाकरे मोदींना उद्देशून म्हणाले.

बदल घडवण्याची जबाबदारी जनतेवर – शरद पवार

तरुणांमध्ये नोकरीबाबत अस्वस्थता आहे. दरवर्षी दोन कोटी नोकऱया निर्माण करू असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन ते पुर्ण करू शकले नाही. सत्तेचा वापर करून विरोधकांना अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण आणि आरोग्य सेवेमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणत लोकांना चांगली सेवा उपलब्ध करून दिली. त्यांना जेलमध्ये टाकले. देशात बदल घडवण्याची जबाबदारी आता जनतेवर आहे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.देशात बिहारमध्ये 42 जागांसाठी एका टप्प्यात निवडणुका घेतल्या जात आहेत. उत्तर प्रदेशातही 62 जागांसाठी दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. मात्र, यंत्रणेचा अभाव, यश मिळण्याची शाश्वती नसल्याने 48 जागा असणाऱया महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका घेण्याची वेळ भाजपवर आली आहे. 2014 मध्ये काँग्रेसने महागाई वाढविल्याचा आरोप केला. आमची सत्ता आल्यावर पेट्रोल, डिझेल, सिलेंडरचे दर कमी करण्याचे आश्वासन मोदी यांनी जनतेला दिले. मात्र, भाजपच्या दहा वर्षांच्या काळात महागाईत आणखी भर पडली, असे पवार म्हणाले.