महाराष्ट्र हुकुमशहाच्या हातात जाऊ देणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळवारी बारामती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व गद्दार गटांवर सडकून टीका करत त्यांची चांगलीच पिसे काढली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा देखील खरपूस समाचार घेतला.

”उद्या 1 मे महाराष्ट्र दिन. आज मध्यरात्री मी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारकाकडे जाणार आहे. या हुतात्म्यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता बलिदान देऊन आपल्याला महाराष्ट्र व मुंबई मिळवून दिली. ते हुतात्मे आपल्याकडे बघत आहेत. महाराष्ट्राची लूट होत आहे. महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जातेय. ते बोलत असतील मी कुणासाठी बलिदान दिलं. मी आज त्यांना शपथ घेऊन सांगतो की तुम्ही सर्व मर्द म्हणुनच गोळ्यांना सामोरे गेलात व आम्हाला संयुक्त महाराष्ट्र मिळवून दिलात. त्यामुळे आता प्राण गेला तरी बेहत्तर त्या हुकुमशहाच्या कचाट्यात महाराष्ट्र जाऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिले.

स्वप्नातही घोडेबाजार

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नुकतीच पुण्यातील रेसकोर्सवर सभा झाली. ठिकाण अगदी योग्य होतं रेसकोर्स. कारण त्यांना झोपेतही घोडेबाजार दिसतो. हे घोड़े वेगळे आहेत. तुम्ही ज्यांना घोडे म्हणून स्वत:सोबत घेतलं ते खेचरं, गाढवं आहेत. खरे घोडे हे अश्वमेधाचे घोडे असतात, रथाचे असतात. ते आमच्यासोबत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात फिरतोय

काल ते एका सभेत पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणाले. जसं भटकता आत्मा असतो तसं एक वखवखलेला आत्मा देखील असतो. हा वखवखलेला आत्मा सगळीकडे जातो. सध्या एक वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात फिरतोय. आम्ही आमच्या मुलांना मुख्यमंत्री करायला लढत आहोत असा यांचा आरोप आहे. पण हे फक्त स्वत:साठी लढत आहेत आणि यांची कामं ही सगळी मित्रांसाठी असतात. आमच्या मुलांना मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल. मुख्यमंत्री होणं म्हणेज अमित शहांनी एका फोनवर जय शहाला बीसीसीआयचा अध्यक्ष केलं तसं नाहीए. जनता ठरवते ते. हा जो वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात फिरतोय त्याला जरा तरी संवेदना असतील तर त्याने ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाकड़े जावे. यांच्यासारखाच एक वखवखलेला आत्मा गुजरातमध्ये जन्मलेला. तो व्हाया आग्रा महाराष्ट्रावर चालून आलेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य चिरडायला आलेला. महाराष्ट्र गिळायला आलेला. 27 वर्ष तो महाराष्ट्रात राहिला. आता त्याचा आत्मा इथेच भटकत असेल. ही एवढी वखवख बरी नाही.

एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला सर्व भ्रष्टाचारी

शिवसेना सोबत होती तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधी प्रचारासाठी महाराष्ट्रात आजच्याइतके फिरावे लागत नव्हते. 2014 मध्ये काय त्यांचा रुबाब होता. 56 इंचाची छाती होती. एक अकेला सब पे भारी असे ते विरोधकांना उद्देशून म्हणायचे. कारण शिवसेना सोबत होती. आता पहिल्यासारखा त्यांचा आत्मविश्वास राहिलेला नाही. छातीमधली सर्व हवा निघून गेली आहे. एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला सर्व भ्रष्टाचारी अशी मोदींची अवस्था झाली आहे, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली.

यांचा महाराष्ट्र द्वेष संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासूनच

यांनी आपल्याला कोणताही आदर्श दिला नाही. ना नेता दिला ना विचार दिला. स्वातंत्र्याच्या लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही ते नव्हते. पण त्या लढ्यात माझे आजोबा अग्रणी होते. माझे वडिल माझे काका श्रीकांत ठाकरे आजोबांच्या खांद्यला खांदा लावलून लढत होते. जनसंघ त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीत सामिल झालेला. घुसायचं व काय मिळेल ते घेऊन बाहेर यायचं हेच यांचं सुरू आहे. त्यानंतर तेव्हाही निवडणूक लढायची वेळ आली तेव्हा जागावाटपावरून घोळ करून. संयुक्त महाराष्ट्र समिती फोडण्याचं पाप या भाजपच्या बापाने म्हणजेच जनसंघाने केलं होतं. महाराष्ट्र द्वेष हा तेव्हापासूनचा आहे. शिवसेनेच्या मशाल गीतातील जय भवानी जय शिवाजी बद्दल यांनी आक्षेप घेतला. जय भवानी जय शिवाजी हा आमचा आत्मा आहे. हे जे बिना आत्म्याची भटकती शरीरं फिरतायत त्यांना जय भवानी जय शिवाजीचं महत्त्व नाही कळणार. जय भावनी बद्दल एवढा मत्सर का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

निर्मला बाईंच्या पतीनेच केली टीका

जीएसटीच्या माध्यमातून किती छोटमोठ्या व्यापाऱ्यांची पिळवणूक होते ते जाऊन विचारा. किती यांचे जुमले. हे 15 लाख देणार होते. कुणाच्याच खात्यात आले नाही. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात हजारो कोटी आले. दोन ते अडीच वर्षात त्यांनी कमावले. जे काँग्रेसला साठ वर्षात जमलं नाही ते यांनी करून दाखवलं. काँग्रेसला खरंच ते जमलं नाही. मोदीजींनी अडीच वर्षात करून दाखवलं. अर्थमंत्री निर्मला सितारामन होत्या. कोर्टाचा निकाल येईपर्यंत दहा हजार कोटींचे रोखे छापून तयार ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाने यांची वेळेत हंडी फोडली. याच सितारामन बाई बोलल्या आहेत पुन्हा ही स्कीम आणणार. म्हणजे पुन्हा तुमची लूट. त्यांचे पती परकला प्रभाकर यांनी तर हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचे सांगितलेआहे. त्यांनी त्याचे नाव मोदी गेट ठेवले आहे. तुमच्याच मंत्रीमंडळातल्या मंत्रीणबाईंचे यजमान बोलतायत. मंत्रीणबाईंचा वशिला असेल म्हणून त्यांना अद्याप अटक झालेली नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

… तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही

पाशवी बहुमतावर यांना घटना बदलायची आहे. महाराष्ट्राच्या सुपुत्र बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहेली घटना तुम्हाला बदलायची आहे. तिथेही ती महाराष्ट्र पुत्राने लिहली म्हणून बदलायची आहे. एका दलित कुटुंबातील तरुणाने ती लिहली आहे. इथे सुद्धा तुमचा महाराष्ट्राबद्दलचा आकस दिसतोय. जाहीर इशारा देतोय. जर घटनेला बदलण्यासाठी हात लावाल तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही. असेल हि्ंमत तर घटना बदलायची नुसती तयारी करुन दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.