स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे मराठी भाषा दिवसानिमित्त कार्यक्रम, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

कवी कुसुमाग्रज अर्थात ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रतिवर्षीप्रमाणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मराठी भाषा दिवसानिमित्त कार्यक्रम मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9. 30 या कालावधीत बिर्ला मातोश्री सभागृह, न्यू मरीन लाईन्स येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचीही कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते आणि खासदार अनिल देसाई, महासंघ कार्याध्यक्ष, आमदार विलास पोतनीस, महासंघ कार्याध्यक्ष आमदार सुनील शिंदे आणि महासंघ सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महासंघ पदाधिकारी आणि संलग्न समित्यांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

संपूर्ण परिसर होणार भगवामय
समित्यांचे पदाधिकारी कार्यक्रम स्थळाच्या परिसरात भगवे झेंडे, पताका आणि मराठी भाषा दिवसाचे बॅनर्स लावून संपूर्ण परिसर भगवामय करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ‘मोगरा फुलला’ सादरकर्ते व संगीतकार राहुल रानडे यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास शिवसेना नेते, लोकप्रतिनिधी, विविध आस्थापनांतील स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. जागतिक मराठी भाषा दिवसाचा कार्यक्रम एक आगळावेगळा कार्यक्रम म्हणून समितीच्या चळवळीच्या इतिहासात कार्यक्रमाची नोंद होईल असा प्रयत्न सर्व कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.