
रुग्णालयातून गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकाकडे रिक्षामधून जात असताना रिक्षाचालक आणि त्याच्या सोबत असणाऱ्या बुरखाधारी महिलेने 65 वर्षाच्या वृध्दास लुटल्याची घटना उदगीर शहरात घडली. 43 हजार रुपये रोख आणि कागदपत्रे जबरदस्तीने काढून घेण्यात आले.
नबीसाब महेबुबसाब शेख (65) रा. वायगाव सताळा यांनी या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ते तब्येत ठिक नसल्यामुळे उदगीर येथे रुग्णालयात आलेले होते. सोबत 15 हजार रुपये होते. पुन्हा बॅक ऑफ इंडियामधून त्यांनी 28 हजार रुपये काढले. डॉक्टरांनी सिटीस्कॅन करावे लागेल, सोबत कोणाला तरी घेऊन या असे सांगितले होते. त्यामुळे उद्या परत येतो असे सांगून ते रुग्णालयातून निघाले.
गावाकडे जाण्यासाठी दुपारी 1 वाजता दवाखान्यातून बाहेर आले असता एक रिक्षाचालक त्यांच्याजवळ आला. बसस्थानक येथे जायचे आहे असे त्यास सांगून रिक्षामध्ये बसले असता त्यात एक बुरखाधारी महिला अगोदरपासूनच बसलेली होती. रिक्षा बसस्थानकाकडे घेऊन न जाता नई आबादीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घेऊन जाऊन तिथे त्यांनी धमकाऊन जबरदस्तीने रोख 43 हजार रुपये आणि कागदपत्रे काढून घेतली. रिक्षाचालक आणि बुरखाधारी महिला यांच्याविरुध्द उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालयात आलेल्या वयोवृध्द नागरिकांना रिक्षाचालक बसस्थानकात सोडण्याच्या बहाण्याने रिक्षाचालक आणि त्याची सहकारी बुरखाधारी महिलेने उदगीर शहरात लुटमार सुरू केलेली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हा विषय गांभीर्याने घेऊन या लुटमार करणाऱ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे.





























































