
युगांडा क्रिकेट संघाने अखेर टी-20 वर्ल्ड कपमध्ये प्रवेशाचा झेंडा रोवत नवा इतिहास घडवला. या संघाने कारकीर्दीत प्रथम टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट बुक केले, मात्र दुसरीकडे झिम्बाब्वे संघाचे पुन्हा एकदा स्वप्न भंगले. सलग दुसऱ्या वर्ल्ड कपमध्ये त्यांना स्थान मिळविण्यात अपयश आले.
2024 मध्ये जून महिन्यात आयसीसी टी-20 वर्ल्ड कप वेस्ट इंडीज आणि अमेरिका या देशांत संयुक्तपणे खेळला जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 20 संघांवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. आफ्रिका पात्रता फेरीद्वारे युगांडा हा टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेला अखेरचा आणि आफ्रिका खंडातील दुसरा संघ ठरला आहे. आफ्रिकन क्वालिफायर स्पर्धेतून दोन संघ आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरले. यात नामिबियाने पहिला संघ म्हणून आपले स्थान निश्चित केले, तर युगांडा दुसरा आणि शेवटचा संघ म्हणून आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी झाला. दुसरीकडे झिम्बाब्वेचे वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. हा संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. हिंदुस्थानात झालेल्या वन डे वर्ल्ड कपलाही झिम्बाब्वेचा संघ मुकला होता.
View this post on Instagram
टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या आफ्रिकन क्वालिफायर स्पर्धेत सात संघांचा समावेश होता. यात नामिबिया सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे, तर युगांडा सहा सामन्यांमध्ये पाच विजयांसह दुसऱ्या स्थानावर, तर झिम्बाब्वे तिसऱ्या स्थानी आहे. नामिबिया सरस नेट रनरेटमुळे प्रथम स्थानावर आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्र संघ
2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमधील अव्वल आठ संघ – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, हिंदुस्थान, नेदरलॅण्ड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका
टी-20 वर्ल्ड कप क्रमवारीतील अव्वल संघ – अफगाणिस्तान, बांगलादेश
अमेरिकन क्वालिफायर – पॅनडा
आशियाई क्वालिफायर – नेपाळ, ओमान
पूर्व आशिया– पॅसिफिक क्वालिफायर – पापुआ न्यू गिनी
युरोप क्वालि. – आयर्लंड, स्कॉटलंड
आफ्रिका क्वालि. – नामिबिया, युगांडा.



























































