
जवळपास 13 हजार कोटींच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीला अखेर हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नीरव मोदीची प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू करण्यासाठी ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने शुक्रवारी मंजुरी दिली. मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात असून त्याला हिंदुस्थानात आणल्यानंतर मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात ठेवले जाणार आहे.
लंडनच्या न्यायालयाने 25 फेब्रुवारीला नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी मंजुरी दिली होती. मोदीविरोधात सबळ पुरावे आहेत. त्याला हिंदुस्थानातील खटल्यात उत्तर द्यावेच लागेल. त्याच्यासाठी मुंबईतील आर्थर रोड तुरुंग योग्य असल्याचे न्यायाधीशांनी नमूद केले होते. या निर्णयाची अधिकृत माहिती ब्रिटनच्या गृह मंत्रालयाला देण्यात आली होती. त्याआधारे गृहमंत्र्यांनी मोदीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली. यामुळे नीरव मोदीला मोठा झटका, तर हिंदुस्थानी तपास यंत्रणांना दिलासा मिळाला आहे.
नेमके प्रकरण काय?
नीरव मोदीने मामा मेहुल चोक्सी तसेच पंजाब नॅशनल बँकेतील काही अधिकाऱयांच्या संगनमतातून 13 हजार कोटींचा घोटाळा केला. हा घोटाळा उघडकीस येण्याआधीच तो परदेशात पसार झाला होता. हिंदुस्थानी तपास यंत्रणांना त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्याला ‘वॉण्टेड आरोपी’ घोषित करून त्याच्याविरुद्ध इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी केली होती. अखेर 19 मार्च 2019 रोजी त्याला अटक झाली. तीन वर्षांनंतर त्याला हिंदुस्थानात आणले जाणार आहे.
























































