
युक्रेनची राजधानी असलेल्या किवमध्ये मोठा अपघात घडला आहे. एक हेलिकॉप्टर इमारतीला धडकून अपघात झाला आहे. अपघातात युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह तीन मंत्र्यांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे,. ज्यामध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. युक्रेनचे पोलीस प्रशासन, बचाव पथक युद्धपातळीवर मदत करत आहेत. अपघातात 22 लोकं जखमी झाले आहेत ज्यामध्ये 10 मुलांचा समावेश असून जखमींचा जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
कीवजवळ जिथे हे हेलिकॉप्टर दुर्घटना झाली आहे, तिथे अनेक इमारती आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, या अपघातात युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिर्स्की यांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनचे पोलीस प्रमुख इहोर क्लेमेंको यांनी पॉलिटिकोला दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत तीन मंत्र्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिस्की, येवेन येनिन आणि यूरी लुबकोविच या मंत्र्यांच्या समावेश आहे.
कीवचे राज्यपाल ओलेक्सी कुलेबा यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे की, दुर्घटनेच्यावेळी किंडरगार्टनमध्ये मुलं आणि कर्मचारी उपस्थित होते. कुलेबा यांनी पुढे सांगितले की, या अपघातात 22 लोकं जखमी झाले आहेत, ज्यामध्ये 10 मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या अपघाताबाबत ना रशियाकडून काही माहिती आली आहे ना युक्रेनने हा रशियाकडून हल्ला करण्यात आल्याबाबत काही म्हंटले आहे.




























































