आहेर नको, लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करा…. लग्नपत्रिकेची होतेय चर्चा

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा, यासाठी विविध उपक्रम प्रशासकीय स्तरावर, विविध स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष राबवत आहेतच. पण नगरमध्ये चक्क लग्नपत्रिकेच्या माध्यमातून मतदान जागृती करण्याचा अनोखा प्रयोग झाला आहे. सध्या ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
लग्नसराई म्हटलं की लग्नाची तयारी, लग्न, विधी, परंपरा या गोष्टी सहज येतात. कोणत्याही लग्नात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे लग्नाची निमंत्रण पत्रिका. या निमंत्रण पत्रिकेत वधू वराविषयी, त्यांच्या कुटूंबाविषयी आणि लग्नातील सर्व कार्यक्रमाच्या तारखांविषयी सविस्तर माहिती दिली जाते. पण सोशल मीडियावर सध्या एक लग्नपत्रिका व्हायरल होत असून त्यामधून चक्क आहेराऐवजी प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन वधूवरांच्या कुटुबियांकडून करण्यात आलंय. विशेष म्हणजे या लग्नपत्रिकेत क्यूआर कोडही टाकण्यात आलाय. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मतदार यादीत मतदारांना नाव शोधता येतेय.
नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील लाखेफळ येथील विनायक कुलकर्णी यांचा मुलगा संदीप यांचे लग्न वधू अंजली सोबत होत आहे. दोघेही वधूवर उच्च शिक्षित आहे. या दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून त्याचे कारण त्यामध्ये दिलेला सामाजिक संदेश हे आहे. विशेष म्हणजे या दोघांनी आहेर देण्याऐवजी मतदान जागृतीबाबत महत्त्वाची टीप लग्नपत्रिकेत लिहिली आहे.
संदीप व अंजली या दोघांच्या लग्नाच्या पत्रिकेत टीप म्हणून लिहिण्यात आले आहे की, ‘आपले आशीर्वाद आणि मत अमूल्य आहेत. आम्हाला आशीर्वाद द्या आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निवडणुकीत मतदान करा, हाच आमच्यासाठी आहेर.’  तसेच या लग्नपत्रिकेत मतदार यादीत नाव शोधण्यासाठी क्यूआर कोड टाकण्यात आला आहे. त्यामुळे सध्या या लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा सुरू असून अनेकांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.