उर्फी जावेदची महिला आयोगाकडे धाव, सुरक्षा पुरवण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तोकड्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात घमासान सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसात तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने शनिवारी उर्फी अंबोली पोलीस ठाण्यात हजर झाली होती. तिथे तिचा जबाब नोंदवून घेण्यात आला. त्यानंतर रविवारी उर्फीने महिला आयोगाकडे धाव घेतली असून आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी तिने केली आहे.

राज्य महिला आयोगाला लिहिलेल्या अर्जात उर्फीने आपली बाजू मांडली आहे. ती म्हणाली की, मी उर्फी जावेद असून मी गेल्या काही वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. मी माझं काम, अभिनय, म्युझिक व्हिडीओ आणि फॅशनच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माझ्याशी किंवा माझ्या कामाशी काहीही संबंध नसताना माझ्याविरोधात पोलिसात तक्रार केली आणि माझ्या कामाविरुद्ध कारवाई करण्यास सांगितलं. सुदैवाने देशात असा कोणताही कायदा नाही, ज्यात मी काही विशिष्ट कपडे घालून बाहेर जावं असं म्हटलं आहे. मला माझे कपडे निवडण्याचा पूर्ण अधिकार असून त्यामुळे मी कुणाचं काहीही नुकसान करत नाही. चित्रा वाघ यांनी प्रसिद्धीसाठी किंवा काही राजकीय कारणांनी केलेली माझ्या विरोधातील ती तक्रार आणि घेतलेल्या पत्रकार परिषदा यांमुळे माझ्या मनावर ताण येत असून मला असुरक्षित वाटत आहे. तसंच, वाघ यांनी मला जाहीररित्या मारहाण करण्याची धमकी दिली आहे. वाघ यांचा राजकीय प्रभाव पाहता अशा प्रकारची हिंसा ही योग्य असल्याचं त्या लोकांना पटवून देत आहेत. त्यामुळे आता माझ्याभोवती घरात आणि घराबाहेर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने मला असुरक्षित वाटत आहे. हे संपूर्ण प्रकरण तडीला जाईपर्यंत मला सुरक्षा मिळावी, कारण या पूर्वी मला मुंबईत असताना कधीही इतकी असुरक्षिततेची भावना वाटली नव्हती. पण, आता माझ्या जिवाला धोका असून मला सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी उर्फीने आपल्या अर्जातून केली आहे.

काही दिवसांपूर्वी उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत महाराष्ट्रात उर्फीचा नंगानाच चालणार नाही, असे वक्तव्य केलं होतं. तसेच उर्फी समोर आली तर तिला थोबडवणार, असा इशाराही दिला होता.