तक्रार मागे घेतली नाही म्हणून अंगावर केले मूत्रविसर्जन

11

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमधील बहराईच येथे एका तरुणाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न केले. याविरोधात पोलिसात तक्रार केल्याने आरोपी व त्याच्या साथीदारांनी मुलीच्या पित्याला नग्न करत बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या अंगावर मूत्रविसर्जन केल्याची संतापजनक घटना घडली आहे. रिंकू तिवारी असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याला व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

रिंकू तिवारीने २ ऑक्टोबर रोजी गावातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिच्याशी जबरदस्तीने लग्नही केले. मुलीच्या पित्याला हे कळताच त्याने मुलीच्या सासरी धाव घेतली. तिला समजावले व पुन्हा घरी आणले. त्यानंतर त्याने रिंकू तिवारी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. हे कळताच संतापलेल्या रिंकू व त्याच्या साथीदारांनी मुलीच्या पित्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत जिवे मारण्याची धमकी दिली. पण मुलीच्या पित्याने त्यास नकार दिला. यामुळे चवताळलेल्या रिंकूने मुलीच्या पित्याला व त्यांच्या दोन मित्रांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना एका खोलीत डांबून बेदम मारहाण करण्यात आली. पण एवढे करूनही रिंकूचे समाधान न झाल्याने त्याने व त्याच्या दोन साथीदारांनी मुलीच्या पित्याच्या व इतर दोघांच्या अंगावर मूत्रविसर्जन केले. मुलीच्या पित्याने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने काहीजणांनी याबद्दल पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी रिंकूच्या तावडीतून मुलीच्या पित्याची व इतर दोघांची सुटका केली व त्यांना रुग्णालयात दाखल केले.

आपली प्रतिक्रिया द्या