
सामना ऑनलाईन। लखनौ
सपा-बसपा आघाडीसाठी आम्ही यूपीत 7 जागा सोडायला तयार आहोत, अशा अफवा पसरवू नका. कारण आम्हाला लोकसभेसाठी तुमच्या महाआघाडीत येण्याची मुळीच इच्छा नाही. तुम्ही राज्यातील सर्व 80 जागा लढवा, आम्हाला त्याचे सोयरसुतक नाही, असा टोला बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज काँग्रेसला लगावला.
काँग्रेसने उत्तर प्रदेशात सपा-बसपासाठी 7 जागा न लढविण्याचा प्रचार सुरू केल्याने मायावती संतप्त झाल्या आहेत. सपा-बसपा आघाडीने यूपीत काँग्रेसच्या महाआघाडीसाठी 2 जागा न लढविण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने 7 जागांवर आपले उमेदवार उभे न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर भाष्य करताना मायावती म्हणाल्या, काँग्रेसने आता उदारपणाचे नाटक करण्याची गरज नाही. कारण आम्हाला त्यांच्या नेतृत्वातील आघाडीसोबत जायचे नाही.
अखिलेशही काँग्रेसवर कडाडले
उत्तर प्रदेशात आमची सपा-बसपा-आरएलडी आघाडी भाजपला पराभूत करायला समर्थ आहे. आम्हाला मदत करण्याचे नाटक काँग्रेस कशाला करतेय? असा संतप्त सवाल सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे.

























































