पनवेलची पाणीबाणी ठाकुरांची सत्ता उलथवणार, संतप्त नागरिक काढणार महापालिकेवर मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, उरण

पनवेल शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यात पालिकेतील सत्ताधारी भाजपला अपयश आले आहे. त्यामुळे आसपासच्या शहरांना मुबलक पाणी मिळत असताना पनवेलकरांना मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी येत्या 19 जानेवारी रोजी महापालिका मुख्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हीच पाणीबाणी रामशेठ ठाकूर यांची सत्ता उलथवणारी ठरणार आहे.

पनवेल शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस उग्ररूप धारण करू लागल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते कांतिलाल कडू यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल पार्क इनमध्ये पनवेलकरांची एक बैठक झाली. या बैठकीला शेकडो नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल महापालिकेचे प्रशासन आणि सत्ताधारी यांनी पनवेल शहराच्या पाणीटंचाईवर कोणतीही ठोस उपाय योजना केली नाही. त्यामुळे डिसेंबर, जानेवारीमध्येच शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. यावर बैठकीतील सर्वच नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या पाणीटंचाईचा जाब विचारण्यासाठी येत्या 19 जानेवारी रोजी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. ठाकूर कंपनीच्या विरोधात छेडल्या जाणाऱ्या या आंदोलनाची जनजागृती करण्यासाठी पुढील 15 दिवस शहरातील चौकाचौकात सभा घेण्यात येणार आहेत.

शिवसेनाही आंदोलनात सहभागी होणार
शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर पाणीपुरवठा वाढवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जोरदार प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे एक एमएलडी पाणी वाढवूनही मिळाले, मात्र ते पुरेशे नाही. पाणीटंचाई दूर करण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत, त्यामुळे येत्या 19 जानेवारी रोजी छेडल्या जाणाऱ्या आंदोलनात शिवसेनाही सहभागी होणार आहे, अशी माहिती शिवसेना महापालिका संघटक प्रथमेश सोमण यांनी दिली आहे.

ग्रामीण भागाची अवस्था बिकट
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाची अकस्था अतिशय बिकट आहे. महापालिकेत समाकिष्ट करण्यात आलेल्या 29 ग्रामपंचायतींतील गावांना पाणी फार कमी दाबाने पाणी मिळते. तळोजाचा पाणी प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना झोपेतून जागे करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांनी व्यक्त केली आहे.