
थंडीत त्वचा कोरडी पडते. चेहऱ्याबरोबरच हातही कोरडे पडतात. त्यामुळे हातांची काळजी घेणेही गरजेचे आहे, पण बऱ्याचदा असे लक्षात येते की, काही लोकं फक्त हातांऐवजी चेहऱ्याची जास्त काळजी घेतात. कोल्ड क्रीम, सीरम, सनस्क्रीन तऱ्हेतऱ्हेच्या क्रीम चेहऱ्याकरिता वापरतात. थंडीत हातांच्या त्वचेचे हायड्रेशन आणि ड्रायनेस अशा समस्या वाढतात, शिवाय या दिवसांत त्वचेतील मॉइश्चरही कमी होते. थंडीच्या दिवसांत बरेच जण चेहरा आणि पायाची काळजी घेतात, मात्र हातांकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे पाहूया हातांवरील त्वचा मुलायम होण्याकरिता हँड क्रीमचे फायदे.
शरीराच्या तुलनेत हातांना कोरडेपणा लवकर येतो. त्यामुळे हातांची त्वचा फाटणे, सुरकुत्या पडणे असे त्रास दिसू लागतात. हल्ली सॅनिटायझर वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे. याकरिता हातांसाठी तयार केलेले क्रीम वापरले तर हातांच्या त्वचेला मुलायमपणा येऊन हात मऊ पडतात.
कोणतेही काम करताना हातांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे कधी कधी हातांची त्वचा कापली जाते, खरचटते. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून हँडमेड क्रीम वापरल्यास हात सुरक्षित राहतात.
क्यूटिकल्सपासून नखांच्या संसर्गाला प्रतिबंध होतो. पाणी, धूळ आणि विषाणू यांच्या संपर्कात आल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते, मात्र क्रिमचा वापर केल्याने क्युटिकलला आवश्यक ते पोषण मिळते. हात मऊ राहतात.
हातांच्या त्वचेवर कमी सेबेशियस ग्रंथी असतात. त्यामुळे हात लगेच कोरडे होतात. त्यांची योग्य काळजी न घेतल्यास हातावर पिगमेंटेंशन, सुरकुत्या आणि डिहायड्रेशन होऊ लागते. अशा वेळी हँड मेड क्रीम लावल्याने त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळते. हात अकाली वृद्धत्व आल्यासारखे दिसत नाहीत. हातांना हँडमेड क्रीम लावले की, ते एका थेरपीप्रमाणे काम करते. यामुळे थकवा आणि ताणतणाव कमी होतो.





























































