गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरणात कारवाईचा फास; आठ खासगी रुग्णालये रडारवर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

कॅन्सर सारख्या आजाराची भीती दाखवून स्वतःचे गल्ले भरण्यासाठी गरज नसतांना गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या प्रकरणात आता कारवाईचा फास आवळला जात आहे. बीड जिल्ह्यातील आठ खाजगी रुग्णालये रडारवर आहेत. 10 ऑगस्ट पर्यंत समिती अहवाल सरकारकडे सादर करणार आहे, सरकारच्या निर्देशानुसार पुढची कारवाई केली जाणार आहे. मात्र या कारवाईचे स्वरूप काय असणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बीड जिल्ह्यात ज्या अमानवी घटना घडतात त्या चीड आणि संताप आणणाऱ्या असतात, खासगी रुग्णालयातील गल्ले भरवण्यासाठी बीड जिल्ह्यातील काही स्त्री रुग्णालयांनी महिलांच्या आजारात गर्भाशयाच्या कॅन्सरची भयंकर भीती दाखवून महिलांच्या असुशिक्षितपणाचा फायदा उचलून गर्भाशयाची पिशवी काढण्याचा बाजार मांडला. सामान्य कुटुंबातील धास्तावलेल्या हजारो महिला या भीतीला बळी पडल्या आणि शस्त्रक्रिया करून त्यांनी आपल्या गर्भाशयाच्या पिशव्या गमावल्या. याचे दुष्परिणाम या महिलांना आता भोगावे लागत आहेत. प्राथमिक माहितीनुसार दीड ते दोन लाख महिलांच्या गर्भाशयाच्या पिशव्या काढून टाकल्याचे समोर येत आहे. सरकारने या गंभीर प्रकरणात लक्ष घालून समिती स्थापन करत चौकशीचे आदेश दिले आहेत. या समितीने गर्भाशय काढून टाकलेल्या शंभर ते दीडशे महिलांचा इन कॅमेरा जबाब घेतले आहेत. सर्वच महिलांकडून काही ठराविक रुग्णालयाचा नामोउल्लेख झाला आहे. अजून ही शेकडो महिला आपली कशी फसवणूक झाली हे सांगण्यासाठी समोर येत आहेत. एकीकडे समिती आपले काम करत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात ग्राम पातळीवर सर्वेक्षण केले जात आहे. काही सामाजिक संघटना आणी संस्थासुद्धा मदतीचा हात देत आहेत.

काही खासगी रुग्णालये रेकॉर्ड वर येत आहेत. इन कॅमेरा जबाब घेतल्यानंतर कारवाईचा फास आवळला जाणार आहे, यात बीड शहरातील चार आणि तालुका स्थरावरील चार अशी आठ खासगी रुग्णालये सध्या रडारवर असल्याचे कळते. गर्भाशय शस्त्रक्रियाच्या घटनांचे प्रकरण केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर राज्यात विविध ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात जो पॅटर्न तयार होईल तो राज्यभर राबवला जाणार आहे. म्हणून या कारवाईकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारवाई होणार तर कारवाईचे स्वरूप काय असणार हे ही महत्वाचे ठरणार आहे.