बलरामपुरात दलित तरुणीवर गँगरेप; अमानुष मारहाण

हाथरस येथील भयंकर घटनेने देशभरात संताप व्यक्त होत असतानाच उत्तर प्रदेशात बलरामपूर येथे 22 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला अमानुष मारहाण केली. त्यातच तिने तडफडून प्राण सोडल्याचीही भयंकर घटना घडली आहे. यामुळे अवघा देश सुन्न झाला आहे.

22 वर्षीय दलित तरुणी गुरुवारी काॅलेजमध्ये बीकाॅम द्वितीय वर्षाचे अॅडमिशन घेण्यासाठी सकाळी दहा वाजता गेली होती. नराधम चार ते पाच तरूणांनी मैत्रीच्या बहाण्याने तरुणीचे अपहरण केले आणि सामूहिक बलात्कार करून अमानुष मारहाण केली. बेशुद्ध अवस्थेत एका रिक्षामध्ये बसविले. सायंकाळी सात वाजता घरापाशी आणून टापून दिले. कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

काम करून शिक्षण घेत होती

पीडित तरुणी ही हुशार विद्यार्थिनी होती. तिला वकील व्हायचे होते. बलरामपूरातील एका संस्थेत ती नोकरी करून शिक्षण घेत होती. आधुनिक शेतीचे ज्ञान शेतकऱयांना देणारी ही संस्था आहे.

इंजेक्शन दिले; कंबर, पाय मोडले

  • हाथरसप्रमाणेच बलरामपूरच्या घटनेतही पीडितेवर अत्यंत क्रूरपणे अत्याचार करण्यात आले. तिला गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. सामूहिक बलात्कारानंतर तिचे कंबरेचे हाड तोडले, पाय मोडले असे तिच्या कुटुंबियांनी सांगितले.
  • पीडित तरूणीला प्रचंड वेदना होत होत्या. ती बेशुद्ध पडली होती.
  • बलरामपूर प्रकरणातही पोलिसांनी हात वर केले आहेत. पीडितेच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात तिची कंबर, पाय मोडल्याचा उल्लेख अहवालात नाही, असे जिल्हा पोलीस प्रमुख देवरंजन वर्मा यांनी म्हटले आहे.

दोघांना अटक

चार ते पाचजणांनी आपल्या मुलीचे अपहरण केले आणि सामुहिक बलात्कार केला असे तिच्या आईने सांगितले. पोलिसांनी शाहीद आणि साहिल या दोन नराधमांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या