भयंकर! बलात्कारानंतर गरोदर राहिलेल्या अल्पवयीन मुलीला जिवंत जाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तरप्रदेशात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन महिन्यांपूर्वी बलात्कार झालेल्या गरोदर मुलीला जीवंत जाळल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांवर एफआयआर दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत.

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, एकाच गावात राहणाऱ्या अभिषेक नावाच्या तरुणाने तीन महिन्यांपूर्वी मुलीवर बलात्कार केला होता. मात्र तरुणीने घाबरुन याबाबत घरात वाच्छताही केली नव्हती. मात्र काही दिवसांनी पिडीतेच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. त्यावेळी तिची तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे लक्षात आले. अखेर सगळा प्रकार कळल्यानंतर हे प्रकरण पंचायतीपर्यंत गेले आणि 6 ऑक्टोबर रोजी पंचायतीच्या बैठकीत मुलगी आणि आरोपीचे लग्न लावण्याचे ठरले. त्यानंतर आरोपी अभिषेकच्या आईने पीडितेला घरी नेले आणि अचानक तिच्यावर पेट्रोल शिंपडले आणि त्या गरोदर मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला,असा आरोप पिडीतेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

यात पिडीता गंभीर भाजली असून तिला मैनपुरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला सैफई रुग्णालयात हलविण्यात आले. पीडितेच्या आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आयपीसीच्या कलम 307, 376 आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.