युवा टेनिसपटू वैष्णवी आडकर फ्रेंच ओपनमध्ये खेळणार, ज्युनियर वाइल्ड कार्ड स्पर्धेत एण्ट्री

पुण्याची मराठमोळी युवा टेनिसपटू वैष्णवी आडकर 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया ज्युनियर फ्रेंच ओपन वाइल्ड कार्ड प्ले ऑफ्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. येत्या दोन ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. 2020 सालामध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या ज्युनियर वाइल्ड कार्ड सीरिज (18 वर्षांखालील) यामध्ये जेतेपद पटकावल्यामुळे 16 वर्षीय वैष्णवी आडकर हिला आगामी स्पर्धेत प्रवेश मिळवता आला आहे हे विशेष.

गौरव सोहळा
वैष्णवी आडकर हिची ज्युनियर फ्रेंच ओपन वाइल्ड कार्ड स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाऊन्स टेनिस ऍकॅडमी व अखिल हिंदुस्थानी टेनिस असोसिएशनचे सहसचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी तिने आपले कुटुंब, अभिनव विद्यालय हायस्कूल, प्रशिक्षक केदार शहा यांच्यासह सर्व मार्गदर्शकांमुळे मला इथपर्यंत मजल मारता आली असल्याचे सांगितले.

योनेक्सकडून स्पॉन्सरशिप
टेनिसमध्ये करीअर करणे तसे सोपे नाही. हा खेळ महागडा म्हणूनही ओळखला जातो. अशाप्रसंगी वैष्णवीच्या प्रगतीत आर्थिक अडचण तर निर्माण होत नाही ना, असा प्रश्न वडील निहार यांना विचारला असता ते म्हणाले, आमच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे. तसेच योनेक्स कंपनीकडून तिला स्पॉन्सरशिप मिळत आहे. सुंदर अय्यर हेही लक्ष्यच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सध्या तरी सर्व सुरळीत सुरू आहे.

पुढच्या दोन वर्षांत अव्वल 50मध्ये यायचेय
वैष्णवी आडकर हिला पुढील दोन वर्षांमध्ये लक्षणीय प्रगती करायचीय. ज्युनियर रँकिंगमध्ये अव्वल 50मध्ये येण्याचे ध्येय तिने यावेळी बाळगले आहे. तसेच चारही ज्युनियर ग्रॅण्डस्लॅममध्ये सहभागी होण्यासाठीही ती प्रयत्न करणार आहे. यामुळे तिचा व्यावसायिक टेनिसपटू म्हणून होणारा पुढील प्रवास थोडा सोपा होईल.

आपली प्रतिक्रिया द्या