
>> वंदना ताम्हाणे
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई…’ किती सुंदर भजन आहे हे कीर्तनातले! निवृत्ती म्हणजे मी पणातून निवृत्त होणे. कशातून तर प्रपंचातून, षड्रिपूतून, विकारातून. ज्ञानदेव म्हणजे ज्ञान प्राप्त होणे. अशा संसारातून निवृत्त झाले की, ज्ञान प्राप्त होते. सोपानदेव म्हणजे, सोपे. निवृत्त होऊन प्राप्त झालेले ज्ञान सोपे होते. मुक्ताबाई म्हणजे मुक्त. ज्ञान सोपे झाले की, मुक्त होते, मुक्ती मिळते. ‘निवृत्ती ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई’ भजनाचा आईने सांगितलेला अर्थ. जी वारकरी संप्रदायाची देण. मनाच्या चार अवस्था…
संत ज्ञानेश्वर हे विष्णूचे अवतार असे म्हणतात. श्रीकृष्ण पिवळा पितांबर नेसून कुरूक्षेत्रावर अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करतो व भगवद्गीता सांगतो आणि तोच श्रीकृष्ण काही वर्षांनी भगवी वस्त्र धारण करून गीतारूप ज्ञानेश्वरी सांगतो.
फरक काय? महाभारत ग्रंथात गीता एका अर्जुनाला सांगितली व अर्जुनाबरोबर संवाद आहे तर ज्ञानेश्वरीत सर्वच अर्जुनांसोबत, श्रोत्यांबरोबरच संवाद आहे. गीता 700 श्लोकांचे सायन्स आहे, तर ज्ञानेश्वरी 9000 ओव्यांचे आर्ट आहे. विज्ञानाचे कलेत रूपांतर. भक्तिभाव व समर्पणभाव यांचे सुंदर मिश्रण. संयोग, मिलाफ, समीकरण.
इतके भयानक रक्तपाती युद्ध झाल्यावर बरीच वर्षे युद्धाचे परिणाम राहिल्यावर, पाहिल्यावर ‘नको ते युद्ध’ ही सामान्यजनांचीही आस. संत ज्ञानेश्वरांनीही आर्त हृदयाने दुष्ट संपण्याऐवजी दुष्टपण संपो हीच प्रार्थना, मागणे मागितले. त्यांना सत्कर्माची गोडी लागो. एकमेकांमध्ये प्रेम निर्माण होऊन शत्रुत्वच संपावे व सर्वांचे व्यवहार मैत्रीपूर्ण होवो.
जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो।
भूता परस्परे जडो। मैत्र जिवांचे।
ज्ञानेश्वरांनी नववा रस भक्तिरस, शांतीरस निर्माण केला. कारण ही आजच्या काळाची गरज ‘शांती’ एका नवीन रसाची निर्मिती. 700 च्या 9000 ओव्या भगवंताच्याच भक्तिमार्गासाठी, शांततेसाठी. अद्भुत सर्व.
गीता संपूर्ण तत्त्वज्ञानावर, कर्मावर आधारित. अर्जुनाला युद्ध कर हा आदेश. ज्ञानेश्वरी संपूर्ण भक्तीवर आधारित. ज्ञानेश्वरांनी शेवटी सांगितले आहे की, “देवा, आता कोणतेही युद्ध नको.” पसायदान मागितले ज्ञानेश्वरांनी म्हणजेच श्रीकृष्णाने. युद्ध कर गीतेत सांगितले. आता युद्ध नको ज्ञानेश्वरी सांगते. म्हणजे साडेचार-पाच हजार वर्षांनंतर हा बदल काळानुसार भगवंताचाही. परिवर्तन संसाराचा नियम. परिवर्तनाचा भोक्ता श्रीकृष्ण. जगात दोन भयानक महायुद्ध झाल्यानंतर तिसऱया महायुद्धाची धास्ती सर्वच देशांना. अणूयुद्ध, प्रलयाला आवाहन. सृष्टीचा विनाश… कितीतरी युद्धे! एक अंतर्मनात, दुसरे बाहेर जगात. दोन्हीही भीषणच, विनाशकारी. म्हणूनच संत तुकारामही म्हणतात,
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग। अंतर्बाह्य जन आणि मन।
स्वत:शी लढणे, जगाशी लढणे. युद्ध, द्वंद्व, वैफल्य हीच जीवनशैली, मानवशैली बनली आहे. लुळी, पांगळी पिढी. मनाने व शरीरानेही युद्ध कोणतेही असो, परिणाम एकच. सुख, शांती हे शब्द अनोळखी झाले आहेत. ही संतवचने, ग्रंथवचने शांतीची अमृताक्षरे प्रदान करतात. शांतीशी ओळख करून देतात. ग्रंथातील हे जीवनाचे तत्त्वज्ञान सरळ, साधे, सोप्या भाषेतून वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत ज्ञानेश्वरांनी, तर संत तुकारामांनी त्याचा सुंदर कळस बनून या मंदिराची पूर्तता केली. संत, ग्रंथ, भक्त सामूहिक शक्ती. कीर्तनातील टाळी ही ब्रम्हानंदी टाळी याचसाठी पडत असावी.



























































