
नमिता वारणकर,[email protected]
बावखोल… जरा वेगळा वाटतोय ना शब्द… वसईत शेतीला पाणी पुरवण्यासाठी पूर्वापार बावखोली बांधल्या आहेत… आज त्यांचं संवंर्धन होणं गरजेचं आहे…
तलाव, तळी, विहिरी या जलस्त्रोतांद्वारे आपल्याकडे शेती केली जाते. मुंबईला लागूनच असलेल्या वसईतील अनेक छोटय़ा गावांमध्ये आजही पाण्याची समस्या असल्याने वर्षभर शेतीसाठी पाणी मिळावे याकरिता शेतात 20 ते 25 फूट खोल खड्डा केला जातो. या खड्डय़ांना बावखोल / बावखल असे म्हणतात. वसईत 200 वर्षांपूर्वी खोदण्यात आलेल्या 500 पेक्षा जास्त बावखोलं आहेत. वसईची केळी, वसईच्या भाज्या, मळे हे आपल्यासाठी आकर्षण आहे, मात्र बावखोलांद्वारे पाणीपुरवठा करून होणारी शेती आता कमी होत चालली आहे. या ऐतिहासिक जलस्त्रोतांच्या संवर्धनासाठी सचिन मर्ती हा तरुण कार्यकर्ता ग्रामस्थांच्या मदतीने मेहनत घेत आहे. सध्या वसईतील बावखोलं नकाशावर दिसण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राजस्थान, हरयाणा, गुजरात, आसाम, वसई जिथे पाण्याची समस्या आहे अशा ठिकाणी वर्षभर शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध होण्याकरिता बावखोलं खोदण्यात आली आहेत. गुजरातमध्ये हे बावखोल चौकोनी आकारात बघायला मिळतात. यांना ‘पर्शियन व्हिल’ असेही म्हटले जाते. पोर्तुगिजांच्या काळात बावखोलासाठी खोदलेल्या खड्डय़ाच्या आजूबाजूला लाकडी गोल रिंग किंवा दगड आहे. यामुळे पाणी मातीत मिसळत नाही. शेतकऱयांनी पाणी साठवण्यासाठी हे खोदले आहेत.
बावखोलांचं संवर्धन व्हायला हवे हा विचार मनात आला तेव्हा बावखोलांच्या आजूबाजूच्या घरांचे सर्व्हेक्षण करून दिवसभरात किती पाणी बावखोलात सोडले जाते, याची माहिती मिळवण्यास त्याने सुरुवात केली. तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की, आजही वसई तालुक्यात सांडपाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे काही ठिकाणी हे पाणी सहज उपलब्ध असणाऱया बावखोलात सोडलं जाते. तेथून हे पाणी विहिरीत येतं. त्यामुळे विहिरीतील पाणीही अशुद्ध होतं. यामुळे बावखोलात कोणत्या प्रकारचे सांडपाणी किती प्रमाणात सोडले जाते. उदा. स्वयंपाकघरातून किंवा न्हाणीघरातून बावखोलात सोडण्यात येणाऱया सांडपाण्याचे प्रमाण किती आहे, याचा अभ्यास सचिन मर्तीने करायला सुरुवात केली.
बावखोलांमुळे रोजगार उपलब्ध
वसईत प्रत्येकाची स्वतंत्र विहिर आहे, पण विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही. कारण विहिरीच्या पाण्यात खूप क्षार आहेत. त्यामुळे चवीला हे पाणी खारं लागतं. तसेच 100 ते 150 कुटुंबासाठी पाण्याचे एकच कनेक्शन आहे. त्यामुळे येथे पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात आहे. यामुळे शेती आणि पिण्याचे पाणी लोकांना उपलब्ध व्हावे याकरिता बावखोलांचे संवर्धन होणे आज गरजेचे आहे. कारण याद्वारे लोकांना पिण्याकरिता पाणी सहज उपलब्ध होईल शिवाय बावखोलांद्वारे शेतमळ्यांना पाणी उपलब्ध होऊन शेती चांगली होईल. यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल, तसेच बोवखोलांमध्ये मत्स्यपालन करणे हा रोजगाराचा एक नवा मार्ग येथील नागरिकांसाठी उपलब्ध होईल.
औषधी फवारणी आवश्यक
बावखोलात जमा झालेले सांडपाणी विहिरीत जाते यामुळे विहिरीतील पाणी खराब होते. या पाण्याला दुर्गंधी येते. यासाठी गावकऱयांच्या मदतीने विहिरीतील अपायकारक घटक शोषून घेऊ शकतील अशा औषधांची फवारणी किंवा औषधी वनस्पतींची लागवड बावखोलात करण्यात आली आहे.
लोकवस्तीतील बावखोलांचा विनाश
शेतजमिनीतल्या बावखोलांना अजून काही वर्षे तरी धोका नाही. पण काही वर्षांनी येथील शहरीकरणात वाढ झाली तर ही बावखोलं बुजवली जाऊन त्यावर इमारत उभी राहण्याची शक्यता आहे. भुईगावात पूर्वी 42 बावखोलं होती. आता फक्त 39 आहेत. दीड लाख लिटर पाणी एका बावखोलात वर्षभराकरिता साठवलं जातं. त्यामुळे लोकवस्तीतील बावखोल बुजवण्याकरिता त्यात सांडपाणी सोडले जाते. त्यानंतर ते बुजवण्यासाठी सुरुवात होते, असे तो सांगतो.
बावखोलांचे संवर्धन करून त्याभोवती मोकळी जागा तयार केली की, सुशोभिकरणातही वाढ होईल, शिवाय त्याचं संरक्षणही महत्त्वाचे आहे. बावखोलात सांडपाणी जाऊ नये यासाठी काय करता येईल, बावखोलाची खोली किती असावी, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी, शेतजमिनीत ओलावा आणि सुपिकता टिकून राहण्यासाठी जलस्त्र्ााsतांचे संवर्धन महत्वाचे आहे, या विषयावर सचिन मर्ती अभ्यास करत आहे.
बावखोल स्वच्छतेबाबत जनजागृती
एका बावखोलाचा आकार साधारण 1 ते 2 एकर असतो. यामध्ये वर्षाला साधारण 2 ते 3 लाख लिटर इतकं पाणी साठवता येतं. कधी कधी एकेका बावखोलात 25-30 कुटुंबांची भागीदारी असते. एका गावात किती बावखोल आहेत, याचे सर्वेक्षण करून ज्या गावातील बावखोलांत मोठय़ा प्रमाणात कचरा, गाळ साचला आहे, अशी बावखोलं निवडण्यात आली. गावकऱयांमध्ये बावखोल स्वच्छतेबाबत जनजागृती करून आणि त्यांना प्रोत्साहन देऊन या बावखोलांची स्वच्छता करण्याचे काम सचिन यांनी सुरू केले आहे. बावखोलातून मिळालेल्या कचऱयाचा खत म्हणून वापर करण्यात येतो.
























































