क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचा रविवारी सुवर्णमहोत्सवी गौरव सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

जेष्ठ क्रिकेटप्रशिक्षक वासू परांजपे यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या प्रशिक्षण कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सवी गौरव येत्या रविवारी 17 मार्चला दादरच्या शिवाजी मंदिरात सायंकाळी 6 वाजता करण्यात येणार आहे.यावेळी नामवंत क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचा परांजपे यांच्याशी क्रिकेटवरील धमाल गप्पांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

जेष्ठ क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांनी आपल्या कारकीर्दीत सुनील गावसकर,दिलीप वेंगसरकर ,सचिन तेंडुलकर,संजय मांजरेकर ,सनथ जयसूर्या आणि रोशन महानामा या जगातील महान क्रिकेटर्सना बहुमूल्य मार्गदर्शन केले आहे. परांजपे यांच्या प्रशिक्षक कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. या शानदार आणि मनोरंजक सोहळयाला स्वरा आर्टस् ,आयडीबीआय फेडरल आणि स्पोर्टस नशा.कॉम यांचे सहकार्य लाभले आहे.रविवारी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत आयोजित हा कार्यक्रम क्रिकेटशौकिनांसाठी विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश देण्यात येणार आहे.

वासू परांजपे गौरव सोहळ्याची संकल्पना नामवंत क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांची आहे. यावेळी संझगिरी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या “चॅम्पियन्स” पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचेही प्रकाशन द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांच्या हस्ते होणार आहे.