
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने पेशावरमधील शोमॅन राज कपूर आणि ट्रजेडी किंग दिलीप कुमार यांच्या वडिलोपार्जित घराची खरेदी करून त्याचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर नुकतेच दिलीप कुमार यांनी सोशल मीडियावरून पाकिस्तानातील आपल्या वडिलोपार्जित घराचे फोटो शेयर केले असून या घराच्या आठवणीत ते भावुक झाले आहेत.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे घर पेशावर येथील किस्सा ख्वानी बाजारात आहे. हे घर 100 वर्षे जुने आहे. याच घरात दिलीप कुमार यांचा जन्म झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय हिंदुस्थानात आले होते. 2014 साली पाकिस्तान सरकारने या घराला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले होते. सध्या हे घर मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे. पाकिस्तान सरकार आता या घराची खरेदी करणार असून त्याचे संवर्धन करणार आहे.
नुकतेच पाकिस्तानातील पत्रकार शिराज हसन यांनी दिलीप कुमार यांच्या ह्या घराचे फोटो शेयर केले होते. हे फोटो दिलीप कुमार यांनी आपल्या अकाऊंटवरून शेयर करत त्याचे आभार मानले आहेत. ’माझ्या वडिलोपार्जित घराचे काही फोटो तुमच्याकडे असतील तर मला जरूर पाठवा,’ असे आवाहन ट्विटरद्वारे त्यांनी पाकिस्तानातील चाहत्यांना केले आहे. या घराचे संवर्धन करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतल्यानंतर सायरा बानो यांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केले होते.



























































