ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांचे आज दुपारी पावणेदोन वाजता कर्करोगाने निधन झाले. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.

कोतापल्ले हे राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्षही आहेत. सामाजिक भान असलेले लेखक म्हणून डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची ओळख होती. मराठीच्या पदव्युत्तर परीक्षेत ते तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बीड येथील बंकटस्वामी महाविद्यालयात नोकरीला सुरुवात केली. त्यानंतर ते संभाजीनगर विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक झाले. 1993 च्या सुमारास ते पुणे विद्यापीठात प्राध्यापक रुजू झाले. तेथे ते विभागप्रमुख असताना त्यांची संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाली.

नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म 29 मार्च, इ.स. 1948 या दिवशी जिल्हा नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला. शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यात ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले. त्यांनी 1980 मध्ये मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर येथुन डॉ.यु.म.पठाण सरांच्या मार्गदर्शनाने ‘शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पीएच. डी.चे संशोधन केले, पदवी मिळवली.

कारकीर्द

नागनाथ कोतापल्ले हे इ.स. 1977 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. 2005 पासून 2010पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.

नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले आहे. याउपर, नागनाथ कोतापल्ले हे 1988 ते 95 या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, 1995 ते 96मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते. तसेच ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचे संपादक म्हणुनही त्यांनी काम केले आहे.

मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन, पुण्यातील पहिले औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन (2003) राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन इत्यादी संमेलनांची अध्यक्षपदे नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविली आहेत. 2012मध्ये चिपळूण येथील 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते.

नागनाथ कोत्तापल्ले यांना मिळालेले पुरस्कार:

पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
‘ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध’साठी परिमल पुरस्कार (1985)
‘ज्योतिपर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक (2002)
दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार (2018)
यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (2001)
‘राख आणि पाऊस’साठी बी. रघुनाथ पुरस्कार (1995)
‘राख आणि पाऊस’साठी महात्मा फुले पुरस्कार (1995)
‘साहित्य अवकाश’साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार