लुटमार झाल्याचे नाटक रचणारा निघाला चोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । मुंबई

रात्रीच्या वेळी दुकानात एकटा असताना दोन इसम दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आले. दागिने बघण्याचे नाटक करत त्यांनी चेहऱ्यावर गुंगी आणणारा स्प्रे मारला. त्यानंतर चोरांनी दुकानातील 300 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोकड असा साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार दुकानात काम करणाऱ्या तरुणाने दिली होती. पण एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या तपासात तक्रारदारच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून 7 किलो 14 ग्रॅम एवढा ऐवज हस्तगत केला आहे.

अंधेरी पूर्वेकडील रिबेलो कंपाऊंडमध्ये असलेल्या अतुल इमारतीत महावीर ज्वेलर्सचे दुकान आहे. तेथे कमलेश लोहार हा कामाला होता. 4 मे रोजी दुकानात आलेल्या दोघा इसमांनी चेहऱ्यावर गुंगी आणणारा प्रे मारून लुटमार केल्याची तक्रार दिली होती. दुसऱ्या दिवशी दुकानाचे मालक देवीलाल लोहार आल्यानंतर एकूण 9 किलो 903 ग्रॅम इतके सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. देवीलाल हे नात्याने कमलेशचे मामेभाऊ लागतात. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केदारी पवार, संतोष पवार, एपीआय कामुनी, देवीदास मुपडे, उपनिरीक्षक राहुल पाटील आदींच्या पथकाने कसून तपास सुरू केला होता, पण पोलिसांना कोणताच सुगावा लागत नव्हता. पण कमलेशने दिलेली तक्रार आणि हालचाल संशयास्पद वाटू लागल्यामुळे पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांवर बारीक नजर ठेवली तसेच तांत्रिक बाबींचा अभ्यास सुरूच ठेवला. पथकाने मग कमलेशचे वडील सोहनलाल व भाऊ राकेश यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्यावर कमलेशने तोंड उघडले. हा गुन्हा राजस्थानमधील मित्र दिनेश पुरबिया याच्या साथीने केल्याची कबुली कमलेशने दिली.

नियोजनबद्धरीत्या लुटमार
गुन्हा करण्यापूर्वी कमलेशने पद्धतशीर नियोजन केले होते. त्याने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज, डीव्हीआर, गुह्यात वापरलेले मोबाईल, सिमकार्ड नष्ट केले होते. तसेच आपल्यावर कोणत्याही प्रकारे संशय येता कामा नये याची आरोपींनी सर्व काळजी घेतली होती. असे असतानाही एमआयडीसी पोलिसांनी कमलेश लोहार या भामट्याचा बनाव उघडकीस आणून त्याला बेड्या ठोकल्या.