Video – 12 तास उकळल्यानंतर तयार होतो हा ‘कश्मीरी शाही गुलाबी चहा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अदरक, वेलची घातलेला घट्ट चहा म्हणजे अनेकांची सकाळ ताजीतवानी करणारं पेय. सकाळ, संध्याकाळ, ऑफिसमध्ये असताना झोप उडवायला असा दिवसातनं अनेकदा चहा प्यायला जातो. कुणाला काळा चहा आवडतो तर कुणाला दूध घातलेला. कुणी ग्रीन टी आवडते तर कुणाला लेमन टी. चहाचे बरेच प्रकार आपल्याकडे मिळत असले तरी लखनौ शहरात चक्क गुलाबी रंगाचा कश्मीरी चहा मिळतो. अमन सिरोही या फूड ब्लॉगरच्या फूडी इनकारर्नेट या पेजवर त्याने या चहाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

साधारणत: कश्मीरी चहा म्हटलं की लोकांना कहावा आठवतो. पण हा कहावा नसून चक्क गोड गुलाबी रंगाचा चहा आहे. हा चहा बनविण्यासाठी पाण्यात कश्मीरी चहा पावडर टाकली जाते त्यानंतर ही चहा पावडर तब्बल 12 तास उकळली जाते. एवढे तास उकळल्यानंतर यात दूध, साखर, मीठ टाकले जाते. त्यानंतर एक उकळी आल्यावर त्यात बदामाचे काप, केसर, जावित्री-दालचिनी पूड, टाकली जाते. त्यानंतर पुन्हा तासभर उकळली जाते.

काफ्तानसोबत दिली जाते ही चहा

हा चहा तयार झाल्यानंतर नॉर्मल चहासारखा प्यायला जात नाही. एका मोठ्या वाटीत खारी सारखा एक पदार्थ ज्याला कश्मीरमध्ये काफ्तान म्हणतात तो कुस्करून टाकला जातो. त्यानंतर त्या काफ्तानवर मलईचा जाडसर थर ठेवतात. त्यावर हा गुलाबी चहा ओतला जातो. साठ रुपयात ही चहा विकली जाते. लखनौच्या अकबरी गेट ढलानजवळ हा गुलाबी चहा मिळतो.