
ऑफलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या तसेच शालेय शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना भाग पाडणाऱ्या विकास पाठक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. 30 हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायाधीश पुरुषोत्तम जाधव यांनी आरोपी विकास पाठकची सुटका केली.
जामीन मिळावा म्हणून हिंदुस्थानी भाऊने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला, मात्र गेल्या मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. या निर्णयाला भाऊने मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले. हिंदुस्थानी भाऊच्या वतीने अॅड. अनिकेत निकम आणि अॅड. विवेक आरोटे यांनी याचिका दाखल केली. सीआरपीसी कलम 41 नुसार कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबई पोलिसांनी आपल्या अशिलावर अटकेची कारवाई केली. हिंदुस्थानी भाऊने व्हायरल केलेल्या व्हिडीओ संदेशात विद्यार्थ्यांना केवळ जमून आंदोलनात सहभागी होण्यासाठी बोलावले होते, त्यांना दगडफेक किंवा उग्र आंदोलनासाठी प्रवृत्त केल नव्हते. त्यामुळे पोलिसांनी केलेली अटकेची कारवाई चुकीची आहे. न्यायाधीशांनी अॅड. निकम यांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत हिंदुस्थानी भाऊचा जामीन अर्ज मंजूर केला.



























































