रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. प्रथम स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा, सुसंवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आपण बैठक आयोजित करावी. ग्रामस्थांचा विरोध झुगारून प्रकल्प राबवणे कदापि शक्य होणार नाही. आम्ही स्थानिक ग्रामस्थांबरोबर आहोत असे सांगून शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी मुंबईत आयोजित केलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या चर्चेला आपण उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्टपणे कळवत खडे बोल सुनावले आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता मुंबई येथे रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा आयोजित केली आहे. या चर्चेला त्यांनी खासदार विनायक राऊत यांना निमंत्रण दिले होते. हे निमंत्रण विनायक राऊत यांनी नाकारताना बारसू येथील रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. त्यामुळे सर्वप्रथम स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करावी, सुसंवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. आम्ही स्थानिक ग्रामस्थांसोबत आहोत असे खडे बोल खासदार विनायक राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्राद्वारे सुनावले आहेत.



























































