विश्वविक्रमासाठी विराटला हव्यात ८ धावा !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | मँचेस्टर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि क्रिकेटमधील विक्रम यांचे फार निकटचे नाते असल्याचे आतापर्यंत सिद्ध झाले आहे .इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेला उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरु होत असून ३ लढतींच्या मालिकेतील पहिला सामना मँचेस्टर येथे खेळवला जाणार आहे. या लढतीत विराटने ८ धावा केल्यास तो सर्वात वेगाने २००० धावांचा टप्पा गाठणारा जगातला पहिला क्रिकेटर ठरणार आहे. या विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर उभा असलेला विराट उद्या कारकिर्दीतला ६०वी टी -२० लढत खेळणार आहे. त्याने आतापर्यंत ५९ टी -२० लढतींच्या ५५ डावांत १९९२ धावा नोंदवल्या आहेत. सध्या टी -२० च्या ६६ व्या डावांत २ हजारी धावांचा पल्ला वेगाने गाठण्याचा विक्रम न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅकक्युलमच्या नावावर आहे. त्याच्यापाठोपाठ त्यांच्याच देशाचा मार्टिन गप्टिल याचा क्रमांक लागतो .त्याने ६८ डावांत २ हजारी टप्पा पार केला आहे. आता उद्या विराटने ५५ डावांत २ हजार धावांचा पल्ला पार केल्यास तो नवा विश्वविक्रम ठरेल.