‘धोनीमुळे मी निवृत्तीचा निर्णय घेतलेला, पण सचिनने…’, सेहवागने केला गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज असलेल्या विरेंद्र सेहवागने 2013 मध्ये निवृत्ती स्वीकारली. मात्र टीम इंडियासाठी एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मन्स दिलेल्या सेहवागला मिळायला हवा तशी निवृत्ती घेता नाही आली. संघातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर पुन्हा त्याला संघात जागा मिळत नसल्याने त्याला अखेरचा सामना देखील खेळता आला नाही.

निवृत्तीच्या तब्बल नऊ वर्षानंतर आता सेहवागने निवृत्ती बाबत एक वक्तव्य केलं आहे. 2007 मध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी चार सामन्यात सेहवागने अवघ्या 6,11,33,14 धावा केल्या होत्या. त्याच्या खराब कामगिरीमुळे त्यावेळचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने त्याला संघातून वगळले होते. ”महेंद्र सिंह धोनीने जेव्हा मला संघात घेतले नाही त्यावेळी माझ्या डोक्यात निवृत्तीचे विचार येऊ लागले होते. त्यामुळे मी एकदिवसीय सामने खेळायचे नाही असे ठरवले. मात्र सचिन तेंडुलकरने मला समजावले. त्याने सांगितले की तडकाफडकी निर्णय घेऊ नको. हा फक्त तुझा खराब काळ सुरू आहे. या दौऱ्यावरून घरी जा आणि मग विचार करून निर्णय घे. त्यानंतर मी तब्बल सहा वर्ष क्रिकेट खेळलो व 2013 मध्ये निवृत्ती घेतली”, असे सेहवागने सांगितले. क्रिकबझ या संकेतस्थळीशी बोलताना सेहवागने ही माहिती दिली आहे.