बोधचिन्हातून खान्देशी संस्कृतीचे दर्शन, 97 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण अमळनेर येथे सोमवारी झाले. बोधचिन्हात जळगावसह संपूर्ण खान्देशातील संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले आहे. साहित्य संमेलन 2 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान अमळनेर येथे होणार आहे.

संमेलनाचे बोधचिन्ह साकारण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. यात प्राचार्य मिलिंद भामरे यांनी साकारलेल्या बोधचिन्हाची सर्वानुमते निवड करण्यात आली. बोधचिन्हात लेखणी, केळीची पानं, मराठीचा ‘म’, बहिणाबाईंचा जातं, ग्रामीण भागाचं वाद्य संबळ, आदिवासी वाद्य तरपा, माता सरस्वतीचे बोधचिन्ह, सखाराम महाराज मंदिर मंगळग्रह मंदिराच्या प्रतिमेचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चिन्हाखाली ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’ या ओळी लिहिल्या आहेत.

अमळनेर येथील प्रताप मिल कंपाउंडमधील बन्सीलाल पॅलेसमध्ये बोधचिन्ह अनावरणाचा कार्यक्रम झाला. या वेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. बी.एस. पाटील, शिरीष चौधरी, मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, बोधचिन्ह निर्माते प्राचार्य मिलिंद भामरे आदी उपस्थित होते. तसेच जिह्यातील साहित्यिकांची मोठी उपस्थिती होती. तब्बल 72 वर्षांनंतर अमळनेर येथे संमेलन होत आहे.