
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी उत्साहात आणि शांततेत पार पडली. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. निवडणुकीचा अधिकृत निकाल 19 एप्रिल रोजी जाहीर होणार आहे. मतदार वाढल्याने मध्यवर्ती शाखेत मागच्यापेक्षा जास्त मतदान झाल्याचे दिसून येतंय. तरीही एकूण मतदारांची संख्या पाहता ही टक्केवारी कमी आहे.
उमेदवारांचे समर्थक, यादीत नाव शोधणारे मतदार, ज्येष्ठांचा उत्साह, काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी तुरळक गर्दी असे चित्र राज्यभरातील मतदार केंद्रांवर होते. बॅकस्टेज आर्टिस्टनीही मोठय़ा प्रमाणात मतदान केले. निवडणूक रिंगणात राज्यभरातून 103 उमेदवार उभे होते. मतदानापूर्वीच 60 पैकी 20 जागांवरचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये पुणे येथील 7, नाशिक 3, कोल्हापूर 3, रत्नागिरी, रायगड, सातारा, लातूर, धाराशीव, अमरावती, बेळगाव येथील प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे.
मुंबई आणि उपनगरांत ‘रंगकर्मी नाटक समूह’ आणि ‘आपलं पॅनेल’ या दोन गटांत प्रमुख टक्कर दिसून आली. मध्यवर्तीच्या 4724 मतदारांपैकी यशवंत नाटय़गृहात 1145 जणांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे समजते, तर साहित्य संघात 83 जणांनी मतदान केल्याचे समजते. गेल्या निवडणुकीपेक्षा ही आकडेवारी अधिक आहे. परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांनी यशवंत नाटय़संकुलात मतदानाचा हक्क बजावला. बोरिवली येथे 538 मतदारांनी, मुलुंड येथे 228 तर ऐरोली येथे 536 मतदारांनी मतदान केल्याचे समजते. मतदानाची अधिकृत टक्केवारी उशिरापर्यंत समजली नाही.
मुंबई शहरात 10 जागांसाठी 21 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मुंबई उपनगरात 4 जागांसाठी 8 उमेदवारांमध्ये चुरस दिसून येत आहे. ठाणे येथे 3 जागांसाठी 4 उमेदवारांमध्ये लढत आहे.
मतदारांचा काwल प्रशांत दामलेंना की प्रसाद कांबळींना ते लवकरच समजेल. परिषदेत खांदेपालट होणार की मागची टीम कायम राहणार, की मतदारांचा संमिश्र काwल असेल याचे चित्र येत्या काही तासांत स्पष्ट होईल.



























































