‘अवनी’च्या एन्काऊंटरवरून भाजप मंत्र्यांमध्ये वॉर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

यवतमाळच्या जंगलात शुक्रवारी रात्री ‘अवनी’ वाघिणीचे एन्काऊंटर झाले आणि त्यानंतर एकच हलकल्लोळ उडाला. राज्याच्या वनखात्यालाच नव्हे, तर फडणवीस सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर या एन्काऊंटरवरून आता भाजप मंत्र्यांमध्येच वॉर सुरू झाले आहे. अवनीची हत्या झाली असून हा गुन्हाच आहे असे ठासून ट्वीट करणाऱ्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना थेट राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या मंत्रीपदाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मुनगंटीवार यांनीही मग मनेका गांधी यांना वाट्टेल ती चौकशी करण्याचे आव्हान दिले असून या ‘वॉर’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘ढाल’ घेऊन उडी घेतली आहे. अवनीला ठार मारल्यामुळे मनेका गांधी कमालीच्या संपातल्या आणि त्यांनी या एन्काऊंटरसाठी हैदराबादच्या गॅगस्टरला सुपारी दिली होती असा गंभीर आरोप मुनगंटीवार आणि फडणवीस यांच्यावर केला होता. कायदेशीर आण राजकीय पातळीवर यांचा जाब विचारला जाईल असा दमही त्यांनी भरला होता. यामुळे मुनगंटीवार दिवसभर अस्वस्थ होते. आज अखेर त्यांनी मंत्रालयात पत्रकारांना बोलावले आणि मनातील सगळा राग बाहेर काढला. ते म्हणाले, अवनीला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन मारण्याचा प्रयत्न केला पण वाघिणीने हल्ला केला म्हणून शेवटी गोळी घातल्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. अवनीला गोळ्या घालण्यापूर्वी राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केला होता, असा दावा त्यांनी केला.

पन्नास पैसे खर्च
मनेका गांधी यांनी आरोप करण्यापूर्वी पन्नास पैसे खर्च करून एक फोन केला असता तरी मी सर्व माहिती त्यांना दिली असती. आता मीच त्यांना पत्र लिहून ही सर्व माहिती देणार आहे. अपुऱया माहितीच्या आधारावर त्यांनी हे आरोप केले असे मुनगंटीवार म्हणाले.

पीलभीतमध्ये अभिनंदन केले
केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या पीलभीत मतदारसंघातील एका नरभक्षक वाघिणीला शार्पशूटर शाफत अली खान यांनीच 2009मध्ये गोळ्या घालून ठार केले तेव्हा तेथील वन विभागाने शाफत अली खान यांचे प्रमाणपत्र पाठवून अभिनंदन केले होते याची आठवण मुनगंटीवर यांनी करून दिली. देशातील नऊ राज्यांत शाफत अली खान यांची तज्ञ म्हणून नियुक्ती केली आहे असा दाखला त्यांनी दिला.

कोणत्याही चौकशीला तयार आहे!
या प्रकरणी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा कोणत्याही पातळीवर चौकशी करा. आम्ही सर्व सहकार्य करण्यास तयार आहोत. पण वन कर्मचाऱयांचे मनोबल खच्ची करू नका. वन कर्मचारी हे व्याघ्रसंवर्धन व संरक्षणाचे काम करीत आहेत असे वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची वादात उडी
अवनीच्या एन्काऊंटरवरून मनेका गांधी व सुधीर मुनगंटीवार यांच्यातील वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. अवनीला मारण्याचा नाइलाजाने निर्णय घ्यावा लागला. नाइलाजाने ही कृती करावी लागली. ही प्रक्रिया पार पाडताना त्यात कोणत्या त्रुटी राहिल्या आहेत का याची चौकशी करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘प्राण्यांना तुम्ही कशी वागणूक देता त्यावरून तुमच्या देशाचं महानपण ठरतं, असे महात्मा गांधी म्हणायचे.
-राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

केंद्र सरकारला राहुल गांधी यांच्या प्रमाणपत्राची मुळीच गरज नाहीय. कारण केंद्रातले भाजप सरकार आपले काम प्रामाणिकपणे, गंभीरपणे करीत आहे. यापूर्वी असे काम केंद्रातील अन्य कुठल्याही पक्षाच्या सरकारने केल्याचे मला तरी आठवत नाही
-डॉ. हर्ष वर्धन, केंद्रीय पर्यावरणमंत्री

अवनी… नरभक्षक वाघीण आणि अकाली मातृत्व हरवलेले श्वापदसुद्धा! माणसाच्या संवेदना मेल्या म्हणून अवनी मेली… तिचा जीव आताही तिच्या बछडय़ांमध्येच अडकलाय. शेवटी आईच ती… म्हणूनच ती म्हणतेय… सोशल मीडियावरील हे एक पत्र!

प्रिय पिल्लांनो…
पोहोचले इथे मी सुखरूप. नेमकी कुठे आलेय, स्वर्गात की नरकात ते अजून माहीत नाही. इतक्या माणसांना खाल्ल्याचा आरोप माझ्यावर आहे त्यामुळे बहुधा नरकात आले असावे. पण एक गंमत सांगू का… आपण खाली जे शोधत होतो ना… घनदाट जंगल, भरपूर झाडं, पाण्याचे झरे, तलाव, शुद्ध हवा ते सगळे इथे आहे. आधीच यायला हवे होते इथे असं वाटण्याइतकं छान आहे. असो. उशिरा का होईना, या मनुष्यप्राण्यामुळे ही जागा पहायला तर मिळाली. आणि हो, इथे आधीच आले असते तर तुम्हा दोन गोंडस बाळांना जन्म कसा दिला असता, आईपण कसं अनुभवलं असतं?

इथे वातावरण छान आहे खरं, पण माझ्यातल्या आईला तुमची काळजी वाटतेय. अवघं दहा महिन्यांचं तुमचं वय. कसं जगायचं याचे आपले धडे अपूर्णच राहिले. जेवढं शिकवलंय तेवढय़ावर आयुष्य काढू शकाल का? अर्थात मोठे होत जाल तसतसे स्वतःच्या अनुभवातूनही तुम्ही शिकालच. म्हणजे… या मनुष्यप्राण्याने तुम्हाला मोठं होईपर्यंत जगू दिलं तर! पिल्लांनो, आणखी एक कल्पना आहे. तुम्हीसुद्धा इथेच येता का? आपल्याला हवं ते सगळं आहे इथे. आपण मनुष्यप्राण्याकडे वशिला लावू… का कुणास ठाऊक पण त्याच्या भव्यदिव्य स्वप्नांची वाट आपल्या जंगलातून जाते आणि आपले अस्तित्व म्हणजे त्याची स्वप्नं पूर्ण होण्यातील अडथळा! त्यामुळे लगेच कृती करेल तो! बघा तुम्हाला पटतंय का. तुमच्या उत्तराची वाट पाहतेय…!

summary- war in bjp ministers over avnis encounter