स्वतःभोवती फिरून टाकलेला चेंडू डेडबॉल घोषित करण्याच्या निर्णयावरून वादळ !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली 

सी के नायडू चषक (अंडर २३) क्रिकेट स्पर्धेतील उत्तर प्रदेश आणि बंगाल यांच्यातील क्रिकेट सामना सध्या वेगळ्याच वादामुळे गाजत आहे. अंडर -१९ विश्वचषक जिंकणाऱ्या हिंदुस्थानी संघाचा डावखुरा फिरकीवीर शिव सिंह याने बंगालच्या सेट झालेल्या फलंदाजांना विचलित करण्यासाठी एक आगळीच शक्कल लढवली. त्याने स्वतःभोवती प्रदक्षिणा घालत ३६० अंशाच्या कोनातून फिरत चेंडू टाकला आणि पंचांनी शिवाचा चेंडू डेडबॉल ठरवला. त्यातूनच पुढे वादाला सुरुवात झाली.

सी के नायडू चषक लढतीतील पंच विनोद सेशन यांचा निर्णय गोलंदाज शिव आणि त्याच्या उत्तरप्रदेश संघातील सहकाऱ्यांना भावला नाही. त्यांनी तात्काळ पंचकडे धाव घेत त्यांच्या निर्णयाविरोधात दाद मागितली.त्यामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला. पंच विनोद यांनी नंतर आपले सहकारी पंच रवी शंकर यांच्याशी चर्चा केली आणि युपीचा कर्णधार शिवम चौधरी याला बोलावून शिवाने पुन्हा अशीच ऍक्शन घेत चीनू टाकला तर पुन्हा तो डेडबॉल घोषित करू अशी समजच दिली.पंचांचा हा निर्णय योग्य कि अयोग्य यावर आता क्रिकेट क्षेत्रात मोठा वाद पेटला आहे.   

गोलंदाज शिव काय म्हणतो ! 

युपीचा  डावखुरा फिरकीवीर शिवा सिंह म्हणतो, मी केरळविरुद्धच्या लढतीत अशाच ३६० अंशांच्या शैलीने चेंडू टाकले होते. तिथे पंचांनी माझ्या ऍक्शनवर आक्षेप घेतला नव्हता. मग आतच माझी शैली नियमबाह्य का ठरवली जातेय? फलंदाजांना स्वतःभोवती गोल फिरून रिवर्स स्वीप मारण्याची परवानगी आहे. मग गोलंदाजांना प्रत्येक वेळी वेगळ्या ऍक्शनसाठी आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते हा माझा पंचांना आणि क्रिकेट तज्ज्ञांना सवाल आहे.

दिग्गज पंच टौफेल म्हणतात पंच विनोद यांचा निर्णय योग्यच 

माजी दिग्गज पंच सायमन टौफेल या वादावर भाष्य करताना म्हणाले, गोलंदाज शिवा भले त्याच्या ३६० अंशाच्या गोलंदाजी ऍक्शनचे समर्थन करीत असेल. पण आयसीसीच्या नियमानुसार त्याच्या विचित्र गोलंदाजी शैलीने फलंदाजांचा गोंधळ उडत असेल तर नियमानुसार मैदानातील पंचांना त्याचा चेंडू डेडबॉल ठरणाऱ्यांचा अधिकार आहे. पंच २०.४ २.१ (अयोग्य खेळ) या नियमानुसार गोलंदाजाला त्याच्या चेंडू टाकण्याच्या शैलीबाबाबत सवाल करू शकतात. त्यांना जर वाटले कि गोलंदाज फलंदाजांची एकाग्रता भंग करण्यासाठी जगावेगळी शैली वापरतोय, तर ते त्याचा चेंडू नियमबाह्य ठरवू शकतात.

बेदी आणि  मायकेल वोन यांनीही शेअर केला व्हिडीओ 

शिवा सिंहचा ३६० डिग्री ऍक्शनने फिरकी चेंडू टाकल्याचा व्हिडीओ क्रिकेट जगतात मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. हिंदुस्थानचे माजी कर्णधार आणि डावखुरे फिरकीवीर बिशनसिंग बेदी आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वोन यांनीही हा व्हिडीओ शेअर केला असून ते शिवाच्या बॉलिंग ऍक्शनचा बारकाईने अभ्यास करीत आहेत. आता या आगळ्या वादावर आयसीसी काय भूमिका घेते त्याकडे क्रिकेट शौकिनांचे लक्ष लागले आहे.