नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी कोंडीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या केजरीवाल सरकारला तोंड द्याव्या लागलेल्या समस्यांवर त्वरित तोडगा काढा, अशी मागणी आम्ही चार मुख्यमंत्र्यांनी आज पंतप्रधानांकडे नीती आयोगाच्या बैठकी वेळी केली, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता यांच्यासह आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी नीती आयोगाच्या बैठकीत नरेंद्र मोदींना कोंडीत पकडले.

‘आरपार’ची लढाई
आम आदमी पार्टीने ‘याचना नही, अब रण होगा’ अशा शब्दांत नायब राज्यपालांच्याच विरोधात नव्हे तर थेट मोदी सरकारविरोधात आता ‘आरपार’ची लढाई करण्याची घोषणा ट्विटरवरून केली. त्यानुसार ‘आप’च्या हजारो कार्यकर्त्यांनी संध्याकाळी ४ वाजता मंडी हाऊस येथून पंतप्रधानांच्या निवासस्थानावर चढाई केली. ‘आप’च्या या ‘प्रोटेस्ट मार्च’मध्ये पक्षाचे खासदार संजय सिंह, दिलीप पांडे यांच्यासहित सर्वच नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. ‘आप’च्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जागोजागी बॅरिकेडस् उभारले होते, पण प्रोटेस्ट मार्चला रोखणे पोलिसांना मुष्कील झाले होते. ‘आप’ने हा मोर्चा विनापरवाना काढला असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.

चंद्राबाबू-नितीशकुमार एकत्र
ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, एच. डी. कुमारस्वामी, पिनरई विजयन हे चार मुख्यमंत्री केंद्राविरोधातील संघर्षात अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभे ठाकले असतानाच नीती आयोगाच्या बैठकीत आज चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार हे दोघे राज्याला विशेष दर्जा मिळण्याच्या मुद्दय़ावर एकत्र आल्याचे दिसले. चंद्राबाबू हे भाजपची साथ सोडून ‘एनडीए’तून बाहेर पडले आहेत, तर नितीशकुमार हे एनडीएसोबत आहेत. पण आंध्र प्रदेशला ‘विशेष दर्जा’ देण्याच्या चंद्राबाबूंच्या मागणीला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर बिहारला विशेष दर्जा देण्याची आग्रही मागणी त्यांनी नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांकडे केली.

सनदी अधिकारी संपावर नाहीत
दिल्लीतील सनदी अधिकारी संपावर असून ते आपल्या सरकारची अडवणूक करतात असाही आरोप केजरीवाल यांनी ट्विटरवरून केला होता, पण त्यांचा तो आरोप सनदी अधिकाऱयांच्या संघटनेने पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावला आहे. सनदी अधिकारी कार्यालयात नियमित येत असून बैठका घेत आहेत. सर्व खात्यांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहे. काही वेळा तर आम्ही सुट्टीच्या दिवशीही काम करतो, असे ‘आयएएस’ ऑफिसर्स असोसिएशनच्या मनीषा सक्सेना यांना पत्रकार परिषदेत सांगितले. आम्ही कोणाच्याही बाजूचे नाही. आम्ही कायद्याला उत्तरदायी आहोत असे सांगून त्या म्हणाल्या की, राजकारणासाठी आम्हाला वादात ओढले जाऊ नये.

केजरीवाल नक्षलवादी :- स्वामी
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल हे ‘नक्षलवादी’ आहेत, असा आरोप करून भाजप नेते, खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी खळबळ उडवून दिली. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, पी. विजयन, कुमारस्वामी हे चार राज्यांचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना साथ का देत आहेत, असा सवालही त्यांनी केला. केजरीवाल हे पक्के ‘चारसोबीस’ आहेत, असा आरोप करतानाच त्यांना राजकारणातील काहीच कळत नाही, असा टोला स्वामी यांनी लगावला.

आरोपांमुळे केजरीवाल अडचणीत
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नायब राज्यपालांविरोधातील संघर्षात ट्विटरवरून केलेल्या दोन आरोपांमुळे आज चांगलेच अडचणीत आले. नीती आयोगाच्या आजच्या बैठकीला दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांऐवजी नायब राज्यपालांना उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आल्याचा आरोप केजरीवाल यांनी ट्विटरवरून केला होता. राज्यघटनेच्या कोणत्या नियमांमुळे नायब राज्यपालांना हा अधिकार प्राप्त झाला, असा सवाल करतानाच त्यांना तशी मुभा आपण दिलेली नाही, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले होते, पण त्यांच्या या आरोपावर नीती आयोगाचे विशेष कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी तत्काळ खुलासा केला. नायब राज्यपाल अनिल बैजल हे नीती आयोगाच्या बैठकीत नसल्याचे स्पष्ट करतानाच बैठकीतील उपस्थितांची यादीच त्यांनी जाहीर केली. त्यात बैजल यांचे नावच नव्हते.