हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने मध्य रेल्वेची गोची, अतिवृष्टी जाहीर केल्याने लोकल कमी केल्या आणि ऊन पडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदलत्या निसर्गचक्रामुळे कोणत्याही क्षेत्रात जादा अतिवृष्टी होत असल्याने रेल्वेला सतत हायअलर्टवर रहावे लागत आहे. परंतु हवामान खात्याचा सोमवारचा अंदाज चुकल्याने मध्य रेल्वेची चांगलीच गोची झाली. रविवारी रात्री मुंबई हवामान खात्याने सोमवारी अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला, त्यामुळे सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे सरकारी आदेश निघाले आणि रातोरात मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संडे टाइम टेबल चालविण्याचे प्लॅनिंग केले, परंतु सोमवारी सकाळी पाऊस अचानक गायब होऊन चक्क ऊन पडल्याने मध्य रेल्वेचे अधिकारी बुचकळय़ात पडले.

रविवारी रात्री हवामान खात्याकडून सोमवारी अतिवृष्टी होईल असा इशारा देण्यात आला. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अधिकाऱयांनी तातडीची बैठक बोलावून हायअलर्ट जारी केला. सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची सरकारकडून तयारी सुरू झाली. त्यामुळे अत्यावश्यक कर्मचारी पोहचतील एवढय़ा मर्यादित लोकल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु एवढी सज्जता केल्यानंतर सोमवार सकाळ उजाडली आणि चक्क ऊन पडले. काही मोटरमनना सुटी दिल्यामुळे आयत्यावेळी मोटरमन आणायचे कुठून हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे अनेक लोकल रद्द कराव्या लागल्या.

सर्व स्थानकांत प्रत्येक पंधरा मिनिटांनी किती मिमी पाऊस पडला याची नेंद केली जात असते. जर ट्रॅकमध्ये दोन इंचाइतके पाणी असेल तर लोकल कमी वेगाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले जातात. जर ट्रकवरील पाणी सहा इंचाच्या वर गेले तर मात्र लोकल ठप्प होते. जर 50 मिलीमीटरच्या वर पाऊस पडला आणि त्याचवेळी जर भरतीची वेळ असेल तर मात्र रेल्वे हायअर्लटवर जात असते. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास हायटाइड होती, परंतु तेव्हा पाऊस ओसरल्याने रेल्वेला थोडे हायसे वाटले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रवाशांच्या रोषाचा सामना करावा लागतो

पावसात मोटरमनना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. रेल्वेच्या तांत्रिक बाबी सर्वसामान्य प्रवाशांना माहीत नसतात. त्यामुळे ते नेहमीच टार्गेट होत असतात. त्यांच्याकडे संवाद साधण्यासाठी पर्सनल असिस्टंट सिस्टम असते. पावसात अतिवृष्टीने दृश्यमानता कमी होते. काही वेळा लोकलचे वायपर बंद होते, तर कधी संपर्क यंत्रणा बंद होते. त्यामुळे डोळय़ात तेल घालून लोकल चालवावी लागते, असे रेल कामगार सेनेचे सरचिटणीस बाबी देव यांनी सांगितले.