तरुणासोबत लग्नाचे नाटक, माय-लेकी रोख रक्कम व दागिण्यांसह पसार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर

श्रीरामपूर येथील आई व मुलीने संगनमत करून पांगरी (ता. सिन्नर) येथील तरुणाशी लग्नाचे नाटक केले. त्यासाठी तरूणाकडून तब्बल ५० हजार रूपये रोख घेतले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी लग्नात घातलेल्या दागिण्यासह दोघीही पसार झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी दोघींसह लग्न जमविणाऱ्या आणखी एका तरुणाविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता प्रकाश रोकडे (आई), प्रियंका प्रकाश रोकडे (मुलगी, दोघी रा. वार्ड नं. ७,श्रीरामपूर) जाकीर उर्फ बाबासाहेब बबन पटारे (आंबेडकर वसाहत, दत्तनगर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी किशोर एकनाथ पगार (वय ३२, पांगरी, ता. सिन्नर) या पीडित तरुणाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, किशोर हा सिन्नर येथील एका औषध कंपनीत नोकरीस आहे. अनेक वर्षांपासून त्याचे लग्न जमत नसल्याने त्याने कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील मामाचा मुलगा संजय यादव आवारे याच्याशी संपर्क साधला. संजयचा मित्र किरण इंगळे याने दत्तनगर येथील पटारे याच्याशी त्याची ओळख करून दिली. पटारे याने प्रियंका व अनिता यांची भेट घालून दिली. प्रियंका लग्नाची असून अनिता ही तिची बहीण असल्याचे व मराठा समाजाची असल्याचे सांगण्यात आले. त्यांचे रोकडे ऐवजी शिंदे आडगाव सांगितले.

२८ जून २०१८ रोजी रितसर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम दत्तनगर येथे पटारे याच्या घरी पार पडला. यावेळी किशोरची आई, मामा, भाऊ आदी नातेवाईकही उपस्थित होते. मुलगी पसंत असल्याने लगेचच लग्नही करण्याचे ठरले. मात्र पटारे व अनिता यांनी ५० हजार रूपयांची मागणी केली. मुलगी पसंत असल्याने आपसात चर्चा करून पगार कुटुंबियांनी पैशाची तजवीज केली. त्याच सायंकाळी सात वाजता त्यांचा माळ पद्धतीने विवाह झाला. त्यानंतर प्रियंका पगार कुटुंबियांसमवेत सिन्नरला गेली. यावेळी अनिता तिची कलवरी बनून तिच्यासोबत गेली. दुसऱ्या दिवशी २९ रोजी पगार कुटुंबियांनी पांगरी येथील भक्ताच्या मळ्यात किशोर व प्रियंका यांचा रितसर विवाह लावून दिला. यावेळी तिच्या अंगावर ७ हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र घालण्यात आले.

अनिता हिने आम्ही श्रीरामपूरला मामाच्या घरी जाऊन येण्याचा आग्रह धरला. त्यानुसार १ जुलै रोजी त्या दोघी, किशोर, भाऊ संदीप, आई मंदाकिनी, मामा ज्ञानेश्वर आवारे, मामेभाऊ संजय आवारे, त्याची पत्नी अरूणा यांच्यासह श्रीरामपूरला आल्या. चहा-पाणी झाल्यानंतर अनिता व प्रियंका साडी घेण्यासाठी दुकानात जाऊन येतो असे सांगून घराबाहेर गेल्या. मात्र परत आल्याच नाही. मोबाईलवर संपर्क साधला असता बंद असल्याचे आढळून आले. या सर्व प्रकारानंतर त्यांची फसवणूक झाल्याने लक्षात आले. किशोर व त्याच्या कुटुंबियांनी पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याशी संपर्क साधून सर्व घटना सांगितली. त्यांनी तात्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.