पैसे मोजून हिंदुस्थानी विवाहसोहळ्यात सहभागी होतात परदेशी पर्यटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर

देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. मात्र, कोणताही उपक्रम न राबवता ‘ वेडिंग टूरिजम’ खूप लोकप्रिय होत आहेत. हिंदुस्थानी विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी परदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक हिंदुस्थानात येत आहे. सध्या दिल्ली, जयपूर आणि मुंबईमध्ये अशा प्रकारच्या पर्यटनाची चलती आहे. हिंदुस्थानी विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी परदेशी पर्यटक 10,500 रुपयांपासून 25000 पर्यंतची रक्कम मोजत आहेत. हिंदुस्थानी रीतीरिवाज, प्रथापरंपरा याचे परदेशी पर्यटकांना खूप आकर्षण आहे. त्यामुळे अशा सोहळ्यात सहभागी होऊन ते हिंदुस्थानी परंपरा समजण्याचा प्रयत्न करत आहेत.

ऑस्ट्रियातील क्रिस्टोफ फ्लोम जयपूरमधील अशाच एका विवाहसोहळ्याच सहभागी झाल्या होत्या. आपल्या आयुष्य़ातील हा संस्मरणीय क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. येथे येण्यापूर्वी हिंदुस्थानी परंपरेबाबत मनात अनेक प्रश्न होते. या सोहळ्यात सहभागी होऊन अनेक प्रथांचे महत्व आणि अर्थ समजले. आता खऱ्या अर्थाने हिंदुस्थानी जीवनशैली समजण्यास सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्यात आपल्या कोणीही ओळखीचे नसले तरी येथील आपुलकीने केलेल्या स्वागताने भारावल्याचेही त्यांनी सांगितले. या विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी तब्बल 19000 रुपये मोजले होते.

हिंदुस्थानी विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी काही पोर्टलही चालवण्यात येतात. ‘ जॉइन माय वेडिंग’ नावाच्या पोर्टलची सध्या चर्चा आहे. या पोर्टलद्वारे हिंदुस्थानी जोडपे आपल्या विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी परदेशी पर्यटकांना आमंत्रित करू शकतात. विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी परदेशी पर्यटकांना सुमारे 250 डॉलर म्हणजे 19000 रुपये मोजत आहेत. मेंहदी, संगीत, हळद, साखरपुडा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पर्यटकांकडून वेगळे पैसे आकारण्यात येतात. तसेच हिंदुस्थानी कपडे परिधान करण्यासाठीही वेगळे पैसे आकारण्यात येतात. या पोर्टलचे संस्थापक आणि अध्यक्ष ऑस्टेलियातील ओरसी हे आहेत. दोन वर्षापूर्वी एका हिंदुस्थानी सहभागी झाल्यानंतर अशा सोहळ्यात परदेशी नागरिकांनी सहभागी व्हावे अशी इच्छा झाली आणि त्यातून या पोर्टलची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त पर्यटकांना आपण 25 पेक्षा जास्त हिंदुस्थानी विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी पाठवले आहे. त्यांना चांगले अनुभव आल्याने अशा पर्यटकांची संख्या वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.