पश्चिम बंगालमध्ये चॉकलेट बॉम्ब सापडला तरी एनआयए येते, मग यूपीत का जात नाही? ममता बॅनर्जींचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र व उत्तर प्रदेश सरकारवर हल्ला चढवला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, उत्तर प्रदेशात जंगलराजसारखी परिस्थिती आहे. यावर केंद्र सरकार मात्र गप्प आहे. केंद्र सरकारने उत्तर प्रदेशात किती टीम पाठवल्या आहेत? पश्चिम बंगालमध्ये चॉकलेट बॉम्ब सापडला तरी एनआयएची (NIA) टीम पाठवली जाते. मग यूपीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन देखील ते तिथे का जात नाहीत? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.

याआधी ममता बॅनर्जी यांनी रविवारी ट्विट करून अतिक अहमद हत्या प्रकरणावर हल्लाबोल केला होता. ममता बॅनर्जी यांनी लिहिले की, ‘उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे आणि अराजकता वाढली आहे, ते पाहून मला धक्का बसला आहे. गुन्हेगार आता खुलेआम कायदा हातात घेत आहेत, हे लज्जास्पद आहे. मीडिया आणि पोलिसांसमोर हे घडत आहे. कोणत्याही घटनात्मक लोकशाहीत अशा घटनांना स्थान नाही.

दंगल, हिंसाचार यांसारख्या घटनांमध्ये केंद्र सरकारकडून तपासासाठी अनेक वेळा पथके पाठवण्यात आली आहेत. पश्चिम बंगालमध्ये चॉकलेट बॉम्ब सापडला तरी एनआयएची टीम येते. मग आता यूपीमध्ये केंद्र सरकारने किती टीम पाठवल्या. असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.