बलाढय़ वेस्ट इंडीजचा दारुण पराभव, नवख्या स्कॉटलंडचा 42 धावांनी विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेट खेळातील सनसनाटी काय असते त्याची प्रचीती आज टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पात्रता फेरी लढतीत आली. दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या बलाढय़ वेस्ट इंडीज संघाला नवख्या स्कॉटलंड संघाने 42 धावांनी पराभूत करीत या विश्वचषकात दुसरा उलटफेर घडवून आणला. ‘ब’ गटातील हा पहिला सामना स्कॉटलंडने शानदार रीतीने  जिंकला. 160 धावांच्या प्रत्युत्तरात कॅरेबियन संघ 118 धावांत गारद झाला. टी-20 विश्वचषकात सलग दुसऱ्या दिवशी वेगळाच निकाल पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नामिबियाने 2014 च्या चॅम्पियन श्रीलंकेचा पराभव केला होता. एकूण स्पर्धेत सुरुवातीलाच ‘धक्के पे धक्का’ असे चित्र दिसत आहे.

स्कॉटलंडला त्यांचे सलामीवीर मायकेल जोन्स आणि जॉर्ज मुनसे यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी झाली. जोन्स (20) सातव्या   षटकात जेसन होल्डरच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर क्रॉस (3) लगेच तंबूत परतला. मात्र, मुनसेने एक बाजू धैर्याने लढवत ठेवली.  दुसऱ्या बाजूने  कर्णधार रिची बेरिंग्टनने 16 आणि कॅलम मॅक्लिओडने 23 धावा करत संघाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली. दरम्यान, मुनसेने आपले अर्धशतक पूर्ण केले. स्कॉटलंडने 20 षटकांत 5 बाद 160 धावा केल्या. जॉर्ज मुनसे 53 चेंडूंत 66 धावा करून नाबाद राहिला. अल्झारी जोसेफ आणि जेसन होल्डरने स्कॉटलंडच्या 2-2 फलंदाजांना बाद केले.

वेस्ट इंडियन स्टार फलंदाज फ्लॉप

विजयासाठी 161 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजसाठी काइल मेयर्स आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी 20 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या विकेटसाठी लुईस (14) आणि ब्रँडन किंग (17) यांच्यात 33 धावांची भागीदारी झाली, पण त्यानंतर वेस्ट इंडीजच्या विकेट पाठोपाठ  पडू लागल्या. त्यांचे कागदावरचे स्टार फलंदाज हाराकिरी पत्करून तंबूत परतले. पहिल्या दोन  विकेटसाठी 53  धावांची भागीदारी साकारणाऱ्या  वेस्ट इंडीजचे नंतरचे तब्बल आठ फलंदाज फक्त 79 धावा  जमवून पॅव्हेलियनमध्ये परतले. जेसन होल्डरने एक बाजू नेटाने लढवली, पण त्याला अन्य सहकाऱयांची साथच मिळाली नाही. अखेर  19व्या षटकात संघाचा डाव 118 धावांवर आटोपला.

संक्षिप्त धावफलक

स्कॉटलंड ः 20 षटकांत 5 बाद 160 ( जॉर्ज मुनसे नाबाद 66, मायकेल जोन्स 20, कलम मॅक्लीओड 23, रिची बेरिंग्टन 16; अल्झारी जोसेफ 28 धावांत 2 विकेट, जेसन होल्डर 14 धावांत 2 विकेट )  विजयी वि.

वेस्ट इंडीज ः 18.3 षटकांत सर्व बाद 118 ( काइल मेयर्स 20, एव्हिन  लुईस 14, ब्रॅंडन किंग 17, जेसन होल्डर 38; मार्क वॅट 12 धावांत 3 विकेट, ब्रॅड व्हील 32 धावांत 2 विकेट, मायकेल लिस्क 15 धावांत 2 विकेट)