पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या आणखी दहा फेऱ्या वाढणार, एकूण फेऱ्यांची संख्या 89 होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेवर मेट्रोप्रमाणे नवीन एण्ड टू एण्ड एका डब्यातून शेवटच्या डब्यापर्यंत गँगवे असलेली एसी लोकल दाखल होत असल्याने एसी लोकलच्या आणखी दहा फेर्‍या वाढविण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 79 फेर्‍या होत असून नव्या 10 फेर्‍यांमुळे एकूण एसी लोकलच्या फेर्‍यांची संख्या 89 इतकी होणार आहे.

पश्चिम रेल्वेवर मोटर व विद्युत यंत्रणा लोकल डब्यांच्या खाली बसवण्यात आलेली आणि जादा प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारी एक नवीन वातानुकूलित लोकल सेवेत दाखल होणार असून त्यामुळे दहा अतिरिक्त फेर्‍या चालविणे शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेवर आधी दररोज 48 वातानुकूलित लोकल फेर्‍या होत होत्या. 1 ऑक्टोबरपासून सामान्य लोकल फेर्‍यांच्या बदल्यात 31 वातानुकूलित लोकल फेर्‍या चालवण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातानुकूलित लोकल फेर्‍यांची एकूण संख्या 79 झाली आहे.

एसी लोकलने रोजची 29 लाखांची कमाई

एसी लोकलचे सिंगल जर्नी तिकीट दर निम्म्याने कमी करण्यापूर्वी पश्चिम रेल्वेवर एप्रिल महिन्यात एसीची दररोज 1,939 कार्ड तिकीटे तर सिझनची 20,094 तिकीटे विकली जात होती. 5 जुननंतर एसीचे सिंगल जर्नी तिकीट दर निम्म्याने घटल्यानंतर हळुहळू तिकीटांची विक्री वाढली.

पश्चिम रेल्वेवर सप्टेंबरमध्ये कार्ड तिकीटे 12,444 तर सिझन तिकीटे 54,218 विकली गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर दररोज सरासरी एसी लोकलमधुन पश्चिम रेल्वेला पुर्वी 10 लाख 33 हजार 137 रूपयांचा महसूल मिळायचा आता 29 लाख 89 हजार 772 रूपयांचा महसूल मिळत आहे. तर मध्य रेल्वेवर सध्या एसी लोकलच्या 56 फेर्‍या होत असून दररोज सरासरी 20 लाख 44 हजार 773 रूपयांची कमाई होत आहे.