गोराई-मुंबई कधी जोडणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

 मुंबईपासून जवळच असलेल्या गोराई येथे जाण्यासाठी आजच्या काळातही बोटीने प्रवास करावा लागतो. त्यामुळे येथील रहिवाशांना आरोग्य सुविधा पुरवताना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागतो. गोराई-मुंबई जोडणारा रस्ता कधी बांधणार, अशी विचारणा आज आरोग्य समितीमध्ये सदस्यांनी केली. तेव्हा आरोग्य समिती अध्यक्षा अर्चना भालेराव यांनी याप्रकरणी लवकरच राज्य सरकारच्या प्रतिनिधींसोबत बैठक बोलावावी, असे निर्देश प्रशासनाला दिले.

शहर आणि उपनगराला जोडण्यासाठी राज्य सरकारने सर्वत्र मेट्रोचे जाळे उभारलेले असताना मुंबईच्या कुशीत वसलेल्या गोराईला जाण्यासाठी आजही स्वातंत्र्यपूर्व काळातील जलवाहतुकीचा मार्ग वापरावा लागतो. गोराई हा भूभाग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येतो, मात्र या ठिकाणी सर्व नागरी सुविधा देण्याच्या जबाबदाऱया पालिकेला पार पाडाव्या लागतात. परंतु येथे दळणवळणासाठी रस्ताच उपलब्धच नसल्यामुळे या आरोग्य सुविधा देताना पालिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या विभागात स्मशानभूमी नाही, आरोग्य केंद्र नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना अंतिम संस्कारासाठी आपली लाकडे आपणच जमवावी लागतात, तर अनेकदा अनेक महिलांची प्रसूती बोटीमध्ये होते. त्यामुळे या विभागाला आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी स्थानिक नगरसेविकांनी यावेळी केली.

रस्ता नाही तोपर्यंत विकास नाही
जोपर्यंत गोराईला जोडण्यासाठी रस्ता बांधला जात नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही, असा मुद्दा शिवसेनेचे सदानंद परब यांनी मांडला. तसेच हा भाग सीआरझेडमध्ये येत असल्यामुळे या भागात आरोग्य केंद्र, स्मशानभूमी बांधता येत नाही. या सगळय़ा परवानग्या मिळवण्यासाठी पालिकेने राज्य सरकारच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशी मागणी परब यांनी केली.

मार्वे आणि गोराईचे दुखणे कायमचे मिटणार
सदानंद परब यांनी याबाबतचा मुद्दा स्थायी समितीमध्येही उपस्थित केला. गोराई आणि मालाड मार्वे येथील दुखणे सारखेच असून याबाबत तोडगा काढण्याची मागणी केली. तेव्हा अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित अधिकाऱयांकडून लवकरच याबाबत अहवाल मागवू अशी माहिती सभागृहाला दिली.