
चालत्या वाहनाच्या मागे कुत्रे धावत आल्याने आपली घाबरगुंडी उडते. गाडीच्या मागे लागलेले कुत्रे भुंकून भुंकून अंगावर येतील आणि त्यांच्या कचाट्यात सापडलो तर ते चावतील की काय इतके आक्रमक दिसतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की, कुत्रे नक्की कोणत्या कारणामुळे आपल्या गाडीच्या मागे धावतात? नाही ना ! चला जाणून घेऊया यामागचे उत्तर. ‘ब्लूपॅड’ या अॅपवर संयम पट्टलवार यांनी दिलेल्या या प्रश्नाचे उत्तर वाचा.
– भटक्या कुत्र्यांचे ज्या परिसरात वास्तव्य असते, त्या परिसरातील झाडांवर, गाड्यांवर कुत्रे मूत्रविसर्जन करतात. इतर आसपासच्या कुत्र्यांच्या मूत्राचाही वास ते ओळखतात. ये अपुन का इलाका है! यहा आपनाही राज चलेगा.. हा डायलॉग चित्रपटात गुंड मवल्यांकडून ऐकला असेल. अशीच कुत्र्यांची ही जागा ठरलेली असते. त्यामुळे दुसऱ्या जागेवरची गाडी आली की, कुत्र्यांना दुसऱ्या कुत्र्यांच्या मुत्राचा वास येतो आणि त्याच वासाच्या दिशेने ते भुंकतात, गाडीचा पाठलाग करु लागतात.
– कुत्र्यांनी त्यांच्या डोळ्यादेखत त्याच परिसरातील एखाद्या कुत्र्याला किंवा त्याच्याच परिवारातील दुसऱ्या कुत्र्याला गाडीने उडवलेलं, चिरडलेलं पाहिलं असेल तर कुत्र्यांच्या डोक्यात ती घटना फिट्ट बसते. गाड्यांविषयी त्यांच्या मनात राग निर्माण होतो आणि नेमकं त्या घटनेच्या वेळी कोणती गाडी होती हे ओळखता न आल्याने जेव्हा जेव्हा एखादी गाडी त्याच्या समोरून जाते तेव्हा तेव्हा ते त्या गाडीच्या मागे धावतात.
– कोणता ही मोठ्या आकाराचा प्राणी पाहिला तर कुत्रे त्याच्यावर भुंकू लागतात. तसंच जेव्हा गाडी सुरू होते तेव्हा तिची लाईट हे एका प्राण्याचे डोळे आहेत असं कुत्र्यांना वाटतं आणि गाडी चालू झाल्यामुळे तिचा जो आवाज येतो तो एक प्राणी घुरघुरत असल्याप्रमाणे कुत्र्यांना वाटतं. एकूणचं ती गाडी एक सजीव प्राणी आहे असं कुत्र्यांना वाटतं आणि ते गाडीच्या मागे धावतात.
– कुत्रे जिथे राहतात तिथल्या लोकांना ते चांगलेच ओळखतात. आपल्या इथे कोणी अनोळखी व्यक्ती आली की ती व्यक्ती वाईट उद्देशाने आली आहे असं त्यांना वाटतं आणि ते भुंकतात. गाडी चालवतानाही आपला वास आणि आपला चेहरा त्यांना अनोळखी वाटतो. त्यात आपण हेल्मेट घातलं असेल तर त्यांना आपण चोर वाटतो. त्यामुळे ते आपल्या जागेतील लोकाचं संरक्षण करण्यासाठी गाडीच्या मागे धावू लागतात.
– कुत्रे कितीही आक्रमक, निडर दिसत असले तरी ते घाबरटही असतात. आपण कुत्र्यांच्या समोरून अगदी वेगाने गाडी घेऊन गेलो तर ते दचकतात त्यांना भीती वाटते आणि भुंकत आपल्या गाडीच्या मागे लागून ते ‘मला घाबरवतोस काय? थांब तुला बघतोच मी!’ याच आवेशात असतात.
– एक कुत्रा भुंकू लागला की दुसरा त्याच्यापेक्षा मोठा आवाज करत भुंकतो. जणू एकाने दुसऱ्याला चॅलेंजच दिलेलं असतं. जेव्हा आपण कुत्र्याच्या आजूबाजूने गाडी चालवत पुढे जातो तेव्हा कुत्र्यांना आपण त्यांना चॅलेंज दिलं असं वाटू लागतं आणि ते चॅलेंज स्वीकारून आपल्या गाडीमागे धावू लागतात. मग आपण गाडीचा स्पीड जरा कमी केला की त्यांना आपण जिकलो असं वाटतं आणि ते निघून जातात.
कुत्रे गाडीच्या मागे लागले तर तुम्ही काय कराल ?
गाडीच्या मागे कुत्रे लागले असतील तर एखादी शर्यत लावल्याप्रमाणे त्यांना चिडवण्याचा, डिवचण्याचा, मागे पळण्यासाठी अधिक उद्युक्त करण्याचा अजिबात प्रयत्न करु नका यामुळे ते अधिक आक्रमक होतात, मागून अंगावर झडपही घालू शकतात. कुत्रे मागे धावत असतील तर गाडीचा स्पीड कमी करा किंवा एका ठिकाणी गाडी थांबवल्याने ते शांत होतात आपल्याला कोणतीही इजा ते करत नाहीत. कुत्रे आपल्या मागे लागतील हे माहित असल्यामुळे गाडीच्या मागे बसणारे अनेक लोक कुत्र्यांना मारण्यासाठी छोटे दगड किंवा एखादी काठी ठेवतात आणि ते मागे लागले की त्यांना मारतात. असं अजिबात करु नये. यांने त्यांना इजा होऊ शकते किंवा ते अधिकच आक्रमक होऊ शकतात. कदाचित आपला वास किंवा चेहरा लक्षात ठेवून नंतर कधी दिसल्यावर हल्लाही करू शकतात.
अनेकदा आपण काहीच न करणं हे देखील चांगलं असतं. कुत्रे गाडीच्या मागे लागले तर ज्या वेगाने आपण गाडी चालवत आहोत त्याच वेगात चालवा; कुत्र्याकडे लक्ष देऊ नका आपण पुढे निघून गेलो आहोत म्हणजे आपण काही केलेले नाही असं त्यांच्या लक्षात येतं आणि ते आपोआपच आपला पाठलाग सोडून देतात, शांत होतात. याशिवाय आपण त्यांच्या परिसरातून बाहेर गेलो की ते काही करत नाहीत. दुसऱ्यांच्या परिसरात हस्तक्षेप करायला ती माणसं थोडीच असतात?
मग कळलं का, कुत्रे आपल्या गाडीच्या मागे का लागतात ते! म्हणून त्यांच्यासोबत गैरवर्तणूक करण्याआधी त्यांची बाजूही लक्षात घ्या.



























































