लोटे औद्योगिक परिसरात भीषण वणवा; शेकडो एकर क्षेत्रातील वनसंपदा जाळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड तालुक्यात सध्या जंगलात लागणाऱ्या वणव्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी बोरज ग्रामपंचायतीच्या हद्दीत लागलेल्या वणव्यात शेकडो एकरमधील वनसंपदा जळून खाक झाल्याचे वृत्त ताजे असतानाच आज लोटे औद्योगीक वसाहत परिसरातील भीषण वणवा लागला. लोटे आद्योगिक वसाहतीतील सीईटीपीतील वादग्रस्त घनगाळ ज्या परिसरात सुकविण्यासाठी ठेवण्यात आला आहे. त्याच परिसरात वणवा लागल्याने हा वणवा लागला की, लावण्यात आला अशी चर्चा लोटे औद्योगीक परिसरात सुरु आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प म्हणजेच CETP तील घनगाळ काढण्यावरून सध्या प्रचंड राजकारण सुरु आहे. हा गाळ काढण्याचे ठेका घेलेला ठेकेदार टाकीतून काढलेला गाळ योग्य प्रकारे सुकवत नसल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीने गाळ काढण्याच्या कामाला विरोध केला आहे. ग्रामपंचायतीच्या या विरोधामुळे सीईटीपीतील घनगाळ प्रकरण सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

सीईटीपीच्या टाकीतून काढलेल्या गाळ सुकविण्यावरून सध्या वाद सुरु असतानाच ज्या ठिकाणी हा गाळ सुकविण्यासाठी पसरून ठेवण्यात आला आहे. त्याच परिसरात आज भीषण वणवा लागल्याने हा वणवा लागण्यापेक्षा लावला गेला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. वणवा लागल्याची माहिती येथील अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी भडकणारी आग वेळीच आटोक्यात आणली, आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

गेल्या काही दिवसांपासून कोंकणात वणवे लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या वणव्यांमुळे हजारो हेक्टर जागेवरील वनसंपदा जाळून खाक झाली आहे.आगीत अनेक वन्य प्राण्याचा नैसर्गिक अधिवास देखील नष्ट झाला आहे. सरपटणारे अनेक प्राणी, कृमी, कीटक या आगीत जाळून मृत्युमुखी पडले आहेत. मात्र तरीही वणवे लागू नये म्हणून शासन स्तरावर कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे कोकणात वणव्यांचे प्रकार वाढू लागले असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.