
आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल केंद्र सरकारवर सडकून टीका केली. आजकाल सरकारनं एक किंवा दोन उद्योगपतींवर लक्ष केंद्रित केलं आहे आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हे चित्र बदलले पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले.
‘आज अदानी आणि अंबानी यांच्याकडे बँकांचे हजारो कोटींचे कर्ज आहे आणि ते बँकेत गेल्यावर त्यांना सहज कर्ज मिळते. त्यांची कर्जे सहज माफ होतात पण गरीब शेतकऱ्यांची नाही. म्हणून मी म्हणतो की समता असावी. जर तुम्ही मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ करत असाल तर शेतकर्यांचंही कर्ज माफ करा’, असं राहुल गांधी म्हणाले.
रामदुर्ग भागात सोमवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना चांगला दर दिला जाईल. ‘तुम्हाला योग्य दर दिले जात नाहीत हे खरे आहे. महागाई वाढत आहे. गॅस सिलिंडर आणि इंधनाच्या किमती वाढत आहेत आणि तुमच्या खिशात थोडेच पैसे मिळतात – शेतकर्यांना फक्त एका कामाने दिलासा मिळणार नाही. आम्हाला दर वाढवायचे आहेत आणि तुमचे मार्केटिंगही चांगले करायचे आहे’, असंही ते म्हणाले.
केंद्र सरकारने लागू केलेला जीएसटी हा काही खास लोकांसाठी करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
‘जीएसटी केवळ प्रभावशाली लोकांना मदत करण्यासाठी आणला गेला आहे. हे इतके क्लिष्ट आहे की अनेकांना ते अजिबात समजत नाही. छोटे उद्योग बंद पडले आहेत. दिल्लीत आमची सत्ता आल्यास आम्ही हा जीएसटी बदलू. एक कर असेल आणि तो किमान असेल’, असं राहुल गांधी म्हणाले.

























































