
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेता आणि निर्माता म्हणून स्वतःला सिद्ध केल्यानंतर स्वप्नील जोशी दिग्दर्शकाच्या खुर्चीत कधी बसणार? याबाबत छेडले असता तो म्हणाला, “मला नक्कीच दिग्दर्शन करायला आवडेल, पण अजून ती वेळ आलेली नाही. सध्या माझा संपूर्ण फोकस अभिनयावर आहे. अभिनेता म्हणून मला चांगल्या भूमिका ऑफर होतायत. मनासारखे काम करण्याचा आनंद मिळतोय, परंतु भविष्यात नक्कीच मी दिग्दर्शनाचा विचार करेन.”
स्वप्नील जोशी…मराठीतला चॉकलेट बॉय. ‘मुंबई-पुणे- मुंबई 3’ च्या निमित्ताने तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज झालाय. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ सिनेमाच्या सीरिजमुळे मला ठरावीक वर्षाने का होईना गौतम ही भूमिका पुन्हा साकारायला मिळतेय. पुन्हा त्याच सहकलाकार आणि टीमसोबत काम करायला मिळतेय. फार कमी कलाकारांच्या आयुष्यात असे क्षण येतात. त्यामुळे हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे स्वप्नील सांगतो.
सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ निमित्ताने गौतम आणि गौरी ही प्रेक्षकांची लाडकी जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ हा पहिला असा सिनेमा आहे ज्याचा तिसरा भाग येतोय. याबद्दल स्वप्नील म्हणाला, एखाद्या मराठी सिनेमाचा तिसरा भाग येणे ही केवळ आमच्यासाठी नाही तर तमाम मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची बाब आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ सीरिजच्या सिनेमांना रसिकांनी उचलून धरलंय. गौतम आणि गौरीच्या आयुष्यात आता नवीन काय घडणार आहे ? याची त्यांना उत्सुकता आहे. यापेक्षा अधिक कलाकाराला काय हवंय?
‘मुंबई-पुणे-मुंबई’ सीरिज असो वा, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’सारखी मालिका. त्यातल्या स्वप्नील आणि मुक्ता या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. मुक्ताविषयी तो म्हणाला, “मुक्ता ही माझी चांगली मैत्रीण तर आहेच त्यासोबत ती किती प्रतिभावान अभिनेत्री आहे हे वेगळे सांगायला नको. मुक्तासोबत सहकलाकर म्हणून काम करायला मला नेहमीच आवडते. प्रत्येक कलाकाराचा एक ड्रीम रोल असतो. त्याबद्दल स्वप्नीलचे वेगळे मत आहे. ‘माझ्या प्रत्येक आगामी सिनेमातली भूमिका ही माझ्यासाठी ड्रीम रोलप्रमाणेच असते. भूमिका जोपर्यंत मला आवडत नाही. तोपर्यंत मी तो सिनेमा स्वीकारत नाही. मागचा पुढचा विचार न करता भूमिकेसाठी झोकून देऊन काम करण्याची माझी तयारी असते.’’ असे तो सांगतो.





























































